|
|
प्राचीन काळापासूनच भारत
ऋषिमुनींची भूमी आहे. पुढे त्यांचा वारसा सांगणारे व चालविणारे अनेक पंथ
निर्माण झाले. या अनुयायांमधुनच अनेक संत उदयाला आले. या संतानी जनतेला भक्तीकडे
अध्यात्माकडे आकर्षित केले. त्यामुळेच मरगळलेल्या समाजात नवीन शक्ती भरली
गेली. नवचैतन्य निर्माण झाले. हे संतच समाजामध्ये जागृती निर्माण करीत आणि
सामाजिक परिवर्तन घडवून आणीत असत.
महाराष्ट्रसुध्दा या भक्तिसंप्रदायापासून, या धार्मिक प्रवाहापासून दूर राहू
शकला नाही. महाराष्ट्र नव्हे तर भारत खंड व भारताबाहेरच्या भूमीतसुध्दा कॄष्णभक्तीचा
प्रसार करणाऱ्या चक्रधर स्वामींपासून आपणास माहीत असलेल्या संतांची मोठी
परंपरा चालू होते. महाराष्ट्रातील या संतपरंपरेचा विचार करता ही परंपरा नाथ
संप्रदायाचा प्रभाव असलेली दिसून येते. चक्रधर स्वामी हे नाथपंथीय संतांचेच
प्रवर्तक होते.
महाराष्ट्रात मात्र या संप्रदायाचे दोन प्रवाह दिसून येतात. यामध्ये समाजापासून
दूर राहून उपासना करणारा एक प्रवाह, तर संसारात राहून घरगृहस्थी सांभाळत
उपजीविकेसाठी कामधंदा, व्यवसाय करीत करीत भक्ती करणारा, साधना किंवा उपासनेत
सहभागी होणारा दुसरा प्रवाह. या प्रवाहांपैकीच एक म्हणजे वारकरी संप्रदाय
होय.
वारकरी संप्रदायाची सुरुवात करणारा, आद्य प्रवर्तक कोण हे नक्की सांगता येत
नाही. आपण ज्ञानेश्वरांपासून या पंथास जास्त प्रमाणात समजू लागलो; पण त्यांच्याआधी
त्यांचे आजोबा, पणजोबासुध्दा नित्यनेमाने आषाढी-कार्तिकीची पंढरपूरची वारी
करीत होते, असे दिसून येते. एक मात्र खरे, की ज्ञानेश्वरी हा या संप्रदायाचा
प्रमाण ग्रंथ मानला जातो. तसेच आराध्य दैवत विठ्ठल होय.
ज्ञानेश्वरीसारख्या अप्रतिम ग्रंथाची रचना केली, संत ज्ञानेश्वरांनी; पण
पंढरपूर व पांडूरंगाचे महत्त्व वाढविण्याचे, पसरविण्याचे श्रेय जाते, नामदेवांकडे.
नाथ संप्रदाय खऱ्या अर्थाने गोरखनाथांपासून सुरु होतो. ही एक गुरु-शिष्य
परंपरा आहे. ज्ञानेश्वरांच्या आधी मुकुंदराज होऊन गेले. त्यांचा काळ इ.स.
११२८ ते ११९६ होता. त्यांनी 'विवेकसिंधू' या अप्रतिम ग्रंथाची रचना केली.
पण वारकरी संप्रदायाशी त्यांचा तसा संबंध आलाच नाही. म्हणूनच वारकरी संप्रदाय
मराठी प्रदेशाच्या बाहेर पोहोचविण्याचे श्रेय नामदेवांनाच आहे.
पंढरपूरनिवासी मोरोपंतासारख्या जेष्ट कवीने नामदेवांचे श्रेष्टत्व आपल्या
काव्यात वर्णन केले आहे. ते म्हणतात -
नारदमुनिंचे जे समूह व्रत तेंचि नामदेवांचें /
याणें प्रसिध्द केलें विठ्ठल हें भव्य नाम नामदेवांचें //
वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ओव्या व हरिपाठाच्या अभंगाइतकेच
नामदेवांच्या अभंगानाही महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. आपल्याकडे दैनंदीन
किंवा विशेष प्रसंगी देवाची पूजा केली जाते. पूजेनंतर आपण आरती करतो; पण
या सर्व व्रतांची सांगता करण्यासाठी आपण सर्वजण शेवटी म्हणतो -
घालीन लोटांगण वंदीन चरण / डोळ्यांनी पाहीन रुप तुझे //
प्रेमे अलिंगीन आनंदे पूजीन // भावे ऒवाळीन म्हणे नामा //
हा नामदेवांनी लिहिलेला अभंग. हा अभंग म्हटल्याखेरीज कोणतेच देवकार्य पूर्ण
होत नाही.
ज्ञानेश्वरांबरोबरच नामदेवांनी महाराष्ट्रात भागवत धर्म पसरविला. पण त्याचबरोबर
पांडूरंगभक्तीची बीजे राजस्थान आणि पंजाबमध्ये पोहोचवून ती अंकुरविण्यास
मदत केली. नामदेवांच्या पंजाब यात्रेचे फ़लीत म्हणजे त्यांच्या अनेक अभंगाचा
समावेश शिखांचा धर्मग्रंथ 'गुरुग्रंथसाहेब' यात समाविष्ट केले असून, त्याला
'मुखबाणी' असे म्हणतात.
नामदेवांचा जन्म महाराष्ट्रात ज्या काळात झाला त्या काळचा इतिहास पहाता दिसून
येते, की त्या काळात महाराष्ट्रात सामाजिक आणि सांस्कृतिक अशा अनेक घडामोडी
घडत होत्या; म्हणूनच एतिहासिक दृष्टीने हा काळ आतिशय महत्त्वाचा म्हणून गणला
जाता.
|
|