|
|
नरहर आणि लिंबाबाई या विठ्ठलभक्त दांपत्याला पुढे एक मुलगा झाला. त्याचे नाव दामाशेटी. दामाशेटी म्हणजेच श्री पांडुरंगाचे आवडते भक्त संत नामदेव महाराज यांचे वडील होत.
अशा तऱ्हेने सुमारे सात पिढ्यांपासून चालत आलेली विठ्ठलभक्तीची आणि पंढरपूरच्या आषाढी-कार्तिकी वारीची परंपरा नामदेवांच्या घरात होती. दामाजींनीसुध्दा आपल्या सर्व पूर्वजांप्रमाणेच श्रीपांडुरंगांची भक्ती केली. पंढरपूरची वारीसुध्दा त्यांनी कधी चुकू दिली नाही. ते म्हणत 'विठ्ठलापरते दैवत' नाही.
दामाजीशेटीसुध्दा नरसीबामणी या परभणी जिल्ह्यातील गावातच रहात होते नरसीबामणी जवळच औंढयानागनाथ हे ठिकाण आहे. बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थानांपैकी हे एक स्थान आहे. येथे भगवान शंकराचे जागॄत स्थान आहे. तेथे अनेक शिवभक्तांनी श्री शंकराची उपासना केली होती. भगवान शंकराच्या उपासनेमुळे नरसीबामणी व औंढ्यानागनाथ या दोन संबंध प्राचीन काळापासूनच जुळून आलेले होते.
दामाशेटी व्यवसायाने शिंपी होते. लोकांचे चार कपडे शिवून द्यावेत, पैसे मिळवावेत व कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा, हे त्यांचे जीवन. त्याच-बरोबर ते आपल्या दुकानात विक्रीसाठी कापडदेखील ठेवीत असत. कापडाच्या विक्रीमधूनही त्यांना चार पैसे मिळत असत. रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्याबरोबर घरातील पांडुरंगाची ते पूजा करीत असत. उठता-बसता, वेळ मिळेल तेव्हा ते विठ्ठालाचे नामस्मरण करत असत. रात्रीच्या वेळी ते पांडूरंगाच्या भक्तीचे अभंग म्हणत बसायचे. दर वर्षीची आषाढी-कार्तिकीची पंढरपूरची वारी त्यांनी कधीच चुकू दिली नाही. आपल्या वंशपरंपरेत त्यांनी कधीच खंड पडू दिला नाही.
अशा तऱ्हेने नामदेवांच्या घराण्यात चालत आलेली विठ्ठलभक्तिची उत्कटता पीढी-दरपीढी वाढतच चालली होती. दामाजींच्या तर रक्ताच्या थेंबाथेंबातून विठ्ठलाची भक्ती वहात होती. जणू काही त्यांच्या घराण्यातील विठ्ठलभक्तीच्या धुंद वातावरणाने त्यांना पार भारावून टाकले होते. कामधंदा करीत असताना त्यांची वाणी नेहमी श्रीविठ्ठल नामाचा घोश करीत असायची.
दामाजी मोठे झाले. जनरुढीप्रमाणे लग्नाचे वय झाले. नरसीबामणी गावापासूनच जवळच कल्याणी नावाचे गाव आहे; तिथे गोमाजी शिंपी रहात होता. त्याला गोणाई नावाची मुलगी होती. या गोमाजीच्या गोणाईबरोबर दामाजींचा विवाह करण्यात आला.
दोन माणसांचा संसार सुरु झाला. संसार मजेत चालला होता. गोणाई सुध्दा तशी हुशारच होती. घरातील सर्व कामे पटापट करण्यात ती वाकबगार होती. तीसुध्दा विठ्ठलभक्त होती. ती व्यवसायात दामाजींना मदत करीत असे. घरचे काम, व्यवसाय आणि विठ्ठलभक्ती यात दोघांचा वेळ फ़ार मजेत जात असे. व्यवसायामधूम दामाजीला चार पैसे मिळत होते.
पण असले सुख गोणाईला आवडत नव्हते. तिला हवे होते, लुटूलुटू चालणारे, घरभर रांगणारे, बोबडे बोल बोलणारे, स्वत:च्या कडे-खांद्यावर खेळणारे, बागडणारे लहान मूल. ती तशी रोज विठ्ठलाला प्रार्थणा करायची. पण देवाने अद्यात तिची प्रार्थणा एकली नव्हती; म्हणूनच तिला हे सुख रुचत नव्हते.शेवटी तिने पांडुरंगची केलेली भक्ती त्याला पावन झाली. गोणाईचे म्हणणे त्याने ऎकले. तिला लवकरच दिवस गेले. योग्य कालावधीत ती प्रसुत झली. तिने एका कन्यारत्नाला जन्म दिला. तिचे नाव ठेवले, आऊबाई.
आऊ दिसायला सुंदर, गुटगुटीत होती. रंगाने गोरीपान होती. तिचे डोळे टापोरे व पाणीदार होते. ती घरभर रांगू लागली, की दामाजी आणि गोणाईला आनंद वाटायचा. पण मनात लगेच उदासीनता भरुन जायची. मुलगी काय आज ना उद्या दुसऱ्याच्या घरी जायची. ते परक्याचे धन. मग वंशाला कुलदीपक? हाच मुलगा असता तर! दामाजी आणि गोणाई - परत श्री पांडुरंगाला विनवीत असत. 'देवा एक तरी मुलगा दे.' घराशेजारच्या मुलांच्या बरोबर आऊ खेळत असे. पण गोणाई म्हणायची, मला मुलगा हवा म्हणजेच मी सुखी होईन. देव आपले एकत नाही हे पाहून गोणाई दिवसेंदिवस खंगत चालली होती. तिची स्थिती पाहून दामाजी अस्वस्थ होत असत.
मनात असे दु:ख असले तरी त्यांना पांडुरंगाचाच आधार वाटत होता. त्यांनी पांडुरंगाची भक्ती अजिबात सोडली नाही. पूजाअर्चा, नामस्मरण यांत उणेपणा येणार नाही याबाबत ते दक्ष असत. रोज सकाळी उठून स्नानादी आटोपून श्री विठ्ठलाची पूजाअर्चा, नामस्मरण केल्याशिवाय ते दोघेही तोंडात पाणीसुध्दा घेत नसत. नंतरच ते व्यवसायाकडे वळत. श्री विठ्ठालाला नैवेद्य दाखविल्याशिवाय ते कधीच जेवत नसत. एकादशीचा उपवास करीत असत.
दामाशेटींचे एक मित्र होते. ते एकदा दामाशेटींना म्हणाले," दामा तु पंढरपूरलाच का राहायला येत नाहीस? नरसीबामणीपेक्षा पंढरपूर फ़ार मोठे गाव आहे. तिथे तुला जास्त काम मिळेल. धंदा चांगला चालेल. तुझ्या हाताचे चार पैसे येतील. चांगले सुखाचे दिवस दिसतील."
मित्राचे म्हणणे दामाशेटींना योग्य वाटले. त्याने गोणाईला हे सांगितले व गाव सोडण्याचा निर्णय सांगितला. प्रथम तिने आढेवेढे घेतले. दामाशेटींनी तिची समजूत काढली. तिला ते पटले. घरापासून जवळ श्री विठ्ठल-रखुमाईचे मंदिर होते. दोघे पती-पत्नी रोज विठ्ठल-दर्शनासाठी मंदिरात जात. सोबत आऊलासुध्दा नेत. हा नित्यनेम कधी चुकवला नाही. गोणाई रोज विठ्ठलाला विनवीत असे. "पांडुरंगा, मला एक मुलगा दे. मला दुसरे काहीही नको."
शेवटी विठ्ठालाचे ह्र्दय पाझरले. त्याने गोणाईचे म्हणणे एकले. विनंती स्विकारली. देवाने भक्तीचे फ़ळ गोणाईच्या ओटीत घातले. तिला परत एकदा दिवस गेले. शेवटी आता नक्की वंशाला दिवा मिळणार, या विश्वासाने दोघांना खूप आनंद झाला. या आनंदाने ते नऊ महिने भुर्रकन उडून गेले आणि तो आनंदाचा दिवस उजाडला.
कार्तिक शुध्द एकादशी शके ११९२. पंढरपूरच्या श्री पांडुरंगाच्या भेट-सोहळ्याचा मुख्य दिवस. या शुभदिनी गोणाईने मुलाला जन्म दिला. आता दोघांना हवे होते ते मिळाले होते. दोघांना अतिशय आनंद झाला. दोघांनी मनापासून पांडुरंगाला हात जोडून, त्याचे आभार मानले.
इकडे पंढरपूरात श्री विठ्ठलाचे असंख्य भक्तगण जमा झाले होते. पांडुरंगाचे दर्शन घेत होते. पांडुरंगाचा नामघोष करीत होते. तो पवित्र घोष नामदेवाच्या कानी पडत होता. साक्षात श्री पांडुरंगाच्या कृपाप्रसादामुळे आपल्याला मुलगा झाला, वंशाला दिवा मिळाला, आपले कुळ पावन झाले, असे दोघांना वाटले. गोणाईच्या आनंदाचे वर्णन करताना संत एकनाथ म्हणतात-
द्वारकेहूनि विठू पंढरिये आला / नामयाचा पूर्वज दामाशेटी वहिला // दामा आणि गोणाई नवसीं विठूसीं // पुत्र देई आम्हां देव भक्त राशीं // तोच नामदेव जन्मे शिंपीयाचे कुळी / भक्तीते पाहुनी वेधला वनमाळी // एका जनार्दनी पंरपरा कथियेली धन्य धन्य विठू अनथांची माऊली //
संत जनाबाई ही नामदेवांच्याच घरात लहानाची मोठी झालेली. ती नामदेवांच्या जन्मानंतर या कुटुंबात आली, पण तिनेसुध्दा नामदेवांची कथा एका अभंगातून सांगीतली आहे. ती म्हणते -
गोणाईने नवस केला / देवा पुत्र देई मला //
शुध्द देखोनिया भाव / पोटी आले नामदेव //
दामाशेटी हरुषला / दासी जनीने ओवाळीला //
तसे पहाता सारे संत हे साक्षात्कारी पुरुष असतात. ते आपल्या साधनेने - उपासनेने देवरुप झालेले असतात. त्यामुळे जे कोणी त्यांचे चरित्र सांगतात, त्यांना सामान्य जनतेच्या लौकिक जीवनात ज्या गोष्टी घडतात, त्या यांच्याबाबतीतही सांगाव्यात, हे भाविक मनाला पटत नाही. संत म्हणजे देवरुप आणि त्यांचा जन्म सामान्य माणसारखा वर्णन करुन संगावयाचा हे त्या भाविक मनाला पटत नाही; म्हणून मग पुढे अशा संतांच्या जन्माबद्दलच्या अदभुत कथा तयार होतात. संत नामदेवांच्या जन्माबाबत अशीच एक अद्भुत कथा संत चरित्रकार महिपतबुवा यांनी सांगितले आहे.
अशा या अद्भुताच्या माध्यमातून लोकमानसातील एक श्रध्दा सूचित होते, की भक्त नामदेव हे थोर उपासक व उद्भवाचे अवतार आहेत.
घरात नव्याने जन्मलेल्या बाळाचे सर्वजन कोडकौतुक करीत होते. सर्वांनी त्याच्यासाठी हाताचा पाळणाच केला होता. सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंदाचे उधान आले होते. एक दिवस गोणाईने दामाशेटींना विचारले, "अहो, बाळाचे नाव काय ठेवायचं?"
दामाजी म्हणाले, "आपलं बाळ म्हणजे पांडुरंगाचा कृपाप्रसाद ! त्याच्या नामस्मरणाचं फ़ळ! आपल्यासाठी ईश्वराचे नाम हेच देव झालेय म्हणून आपण बाळाचं नाव ठेवू या 'नामदेव." अशा तऱ्हेने हे बाळ पुढे नामदेव म्हणून ओळखले जाऊ लागले.
दामाजींच्या घरात रात्रंदिवस पांडुरंगाचे नामस्मरण चाले. या धार्मिक वातावरणाच नामदेव लहानाचा मोठा होऊ लागला. घरात तसंच घराच्या बाहेरही धार्मिक वातावरण. या धार्मिक वातावरणाचे संस्कार बाळ नामदेवाच्या मनावर घडत होते.
|
|