|
|
भारतीय लोकजीवनात समता आणि एकात्मता प्रस्थापित करण्याचे महान कार्य, संतश्रेष्ठ नामदेवांनी इसवी सनाच्या तेराव्या शतकात केले. भारताच्या सांस्कृतिक इतिहासाने, त्यांच्या या अजोड कामगिरीची आठवण गेली सहा साडेसहाशे वर्षे जतन करून ठेवली आहे. साम्यधर्माचा नवा इतिहास भारतात घडविणाय्रा या विठ्ठलभक्त्त नामदेवांच्या चरित्राचे खरे मोल व स्वरूप जाणाण्यासाठी, त्यांच्या कालातील सांस्कृतिक परिस्थितीची ओळख करून घेतली पाहिजे.
इ. स. १२७० ते १३५० च्या दरम्यान उत्तरेत मुसलमानी राजसत्ता होती. इ. स. १२६६ ते १२८६ पर्यत गुलाम वंशातील बल्बन हा सुलतान दिल्लीच्या राजसत्तेवर होता. तो मरण पावल्यावर त्याचा नातू कैकोबाद हा तख्तावर आला. पण तो दुबळा निघाल्याने जलालुद्दीन खिलजीने त्याला ठार केले व इ. स. १२९० ते १२९६ पर्यंत राज्य केले. त्याचा कपटाने खून करून अल्लाउद्दीन खिलजीने दिल्लीची गादी बळकविली. अल्लाउद्दीन मरण पावल्यावर, अल्पकाळात चार सुलतान उत्तरेत राज्य करून गेले. इ. स. १३२६ मध्ये मोहंमद तुघलख दिल्लीचा सम्राट झाला आणि इ. स. १३५१ पर्यंत त्याचाच राज्यकारभार उत्तरेत चालू होता.
नामदेवांच्या जीवनकालातील पूर्वार्धात यादवांचे राजघराणे दक्षिणेत राज्य करीत होते.
इ. स. १२७१ ते १३०९ या काळात रामदेवाने दक्षिणेत राज्य केले. आपल्या राज्याचा विस्तार करण्यासाठी सुरूवातीला त्याने काही मोहिमा काढल्या. खानदेश, वह्राड, मध्यप्रदेश, माहिम इत्यादी प्रदेशांतील राजांचा त्याने पराभव केला. पण पुढे हा त्याचा पराक्रम टिकला नाही. दिल्लीच्या सुलतानाचा (जलालुद्दीनचा) सुभेदार अल्लाउद्दीन खिलजी याने देवगिरीवर हल्ला केला, तेव्हा रामदेवाला त्याचे पारिपत्य करता आले नाही उलट त्याच्याशी अपमानकारक तह करणे रामदेवाला भाग पडले. इ. स. १३०७ मध्ये मलिक काफूरने देवगिरीवर पुन्हा स्वारी केली, त्यावेळीसूद्धा त्याने शरणागती पत्करली. एवढेच नाही तर मलिक काफूरन त्याला कैद करून दिल्लीस नेले. पण अल्लाउद्दीनने त्याची मुक्त्तता करून देवगिरीस पाठवून दिले. यानंतर वर्षभरातच (इ. स. १३१०) रामदेवराव मरण पावला. त्यानंतर त्याचा मुलगा शंकरदेव याला फार काळ राज्य उपभोगता आले नाही. शंकरदेवाने जुन्या तहाच्या अटी पाळल्या नाहीत, म्हणून मलिक काफूरने देवगिरीवर स्वारी करून त्याला ठार केले. यादवांचे राज्य राखण्याचा थोडाफार खटाटोप रामदेवाचा जावई हरपाळदेव याने केला. पण तोही अपयशी ठरला. खुश्रुखानाने हरपाळदेवावर चढाई करून,त्याचा शिरच्छेद केला. इ. स. १३१७ च्या सुमारास मुबारकशाह खिलजीने यादवांचे राज्य खालसा केले. दक्षिणेतील एका वैभवशाली हिंदुसाम्राज्याचा असा अस्त झाला. मोहंमद तुघलखाने काही काळ आपली दिल्लीची राजधानी देवगिरीला नेली आणि मुसलमानी रजसत्तेचे ते केंद्र बनविले.
नामदेवांच्या जीवनकालातील उत्तरार्धात दक्षिणेत तुघलख वंशाची राजसत्ता चालू असतानाच बंडाळी माजली. मोहंमद तुघलखाच्या दक्षिणेतील सरदारांनी उभारलेल्या या बंडाचे नेतृत्व जाफरखान ऊर्फ हसन गगूं बहामनी याच्याकडे होते. त्याने इ. स. १३४७ मध्ये गुलबर्गा या ठिकाणी नव्या बहामनी राज्याची स्थापना केली. इ. स. १३५८ पर्यत त्याने राज्य केले. जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात त्याने आपला राज्यविस्तार केला. त्याच्या मृत्यूनंतर (इ. स. १३५८) अनेक राजे बहामनी राज्यावर चाल करून गेले.
अल्लाउद्दीन, मलिक काफूर, मोहंमद तुघलख इत्यादींच्या स्वाय्रांमुळे दक्षिणेतील हिंदुसंस्कृतीवर प्रचंड आघात झाले. श्रीमंत नगरे लुटली गेली. वारंगळ व अनागोंदी ही हिंदुराज्येही मुसलमानांनी बुडविली. अशा पडत्या काळात हरिहर व बुक्क हे दोघे परक्रमी बंधू उदयास आले. विद्यास आले. विद्यारण्य स्वामीकडून प्रेरणा घेऊन तुंगभद्रा नदीच्या तीरावर त्यांनी विजयनगरच्या राज्याची स्थापना केली. इ. स. १३३६ मध्ये या नव्या राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. इ. स. १३४४ पर्यत हरिहर हा विजयनगरचा राजा होता. त्याच्या निधनानंतर बुक्क हा राजा झाला. त्याने इ. स.१३७६ पर्यत राज्य केले. या दोघा शूर राजांनी दक्षिणेतील आपले राज्य झपाट्याने वाढविले. कन्याकुमारीपर्यत या राज्याची सरहद्द विस्तारली होती.
नामदेवकालीन भारतीय समाजजीवन हे पूर्णत: धर्मप्रधान होते. धर्मातुन निर्माण झालेल्या कर्मकांडाचे आणि रूढींचे मोठे प्रस्थ या काळात माजले होते. मनुष्याचे दैनंदिन जीवन धर्मकर्मांनी व्यापून गेले होते. मध्ययुगीन धर्मशास्त्रकारांनी रोजच्या क्रियाकर्मांना धर्माची बैठक दिली. त्यामुळे विधिनिषेधांचे स्तोम माजले. व्यक्त्ती आणि समाज यांमधील व्यवहार कसा असावा त्याचे स्वरुपही धर्मशास्त्राने ठरवून दिले. धर्मवचनांना सामाजिक कायद्याचा मान प्राप्त झाला. धर्मपरंपरा हा श्रध्देचा विषय झाल्याने त्यात काही बदल करणे हे पाप गणले जात असे. समाजाच्या रीतिरिवांजाना जुन्या स्मृतिवनांच्या मार्गाने नेण्याचे प्रयत्न झाले. या धर्मनियमांचे उल्लंघन घडल्यास त्यासाठी प्रायश्चित्ते सांगण्यात आली. प्रसंगी देहांत प्रायश्चित्त वा सामाजिक बहिष्कार आशा कठोर शिक्षा देण्यात येत असत. या दोन्ही शिक्षा ज्ञानेदेवांच्या मातापित्यांना भोगाव्या लागल्या होत्या. त्याचा उल्लेख नामदेवांनी आपल्या `आदि' या प्रकरणात केला आहे, तो असा-
चैतन्याश्रम संन्यासी जाले गृहवासी मुळींच्या प्रकृतीसी ऐक्य केलें
हासिन्नले लोक बरवा हा संन्यास करिती उपहास दर्शनाचा
द्विजीं वाळियेलें जगीं सांडियेलें सेखीं उपेक्षिलें आप्तवर्गी
पाहतील ग्रंथ सभाश्रेष्ठ महाजन वैदिक शास्त्रज्ञ पुण्यश्र्लोक
देहान्त प्रायश्वित्त असे या बोलिलें विचारूनि भलें हित करा
प्रारंभी गुण आणि कर्म याच्या आधारने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे चार वर्ण निर्माण झाले. पुढे ते जन्मजात मानण्यात येऊ लागले . विद्याव्यासंग करणारे ब्राह्मण वर्णश्रेष्ठ ठरले. धार्मिक बाबतीत त्यांचेच वर्चस्व असल्याने सामाजिक व्यवहारातही त्यांनाच अग्रस्थान मिळाले. स्मृतींची म्हणजे धर्मशास्त्राची रचना त्यांनीच केली. लग्नमुंजीपासून और्ध्वदेहिकापर्यंतचे सर्व धार्मिक संस्कार तेच करीत. वेदोपनिषदे, षड्दर्शने,साहित्य इत्यादींचे अध्ययन आणि अध्यापन करण्याचा अधिकार त्यांच्याकडेच होता. कारण सर्व ज्ञानग्रंथच मुळी संस्कृत भाषेत होते. विद्वान पंडितांना चरितार्थासाठी वतने देण्यात येत. त्यांना वर्षासने मिळत. समाजाचे गुरूत्व त्यांच्याकडे होते. परमार्थक्षेत्रात त्यांचा शब्द प्रमाण मानला जात असे. मोक्षाचे मार्गदर्शकही तेच होते. समाजाच्या लौकिक व आध्यात्मिक जीवनाचे सारथ्य ते करीत असत.
जाति-पोटजातींनी आपले परंपरागत व्यवसाय पुढे चलविले. त्यामुळे जातीही जन्मजात समजण्यात येऊ लागल्या. या जातीपातींत परस्पर अन्नव्यवहार बंद झाला. त्यामुळे समान एकात्म आणि संघटित राहाणे अशक्य झाले. यात भर म्हणून वर्णजातींत उच्चनीचतेची भावना रुजली. यामुळे समाजात सर्वत्र पंक्त्तिप्रपंचाच्या भिंती उभ्या राहून फुटिरता आली. अस्पृश्यांना समाजात मान आणि स्थान नव्हते. त्यांची सर्वांगीण उपेक्षा झाली.
सामाजिक जीवनात रोटीबेटी व्यवहारामध्ये संकुचित रुढींचे प्राबल्य माजले. पोटजातींना महत्त्व प्राप्त झाले.धार्मिक जीवनातही कर्मठता आली. सोवळ्या-ओवळ्याला नीतिमूल्यांची कळा आली. स्पृश्यास्पृश्यतेला पारमार्थिक अर्थ प्राप्त झाला. विटाळाकिटाळाच्या कल्पना तयार झाल्या. अंत्यजांना मंदिरप्रवेश नव्हता. त्यांची सावलीही निषिद्ध मानण्यात येत असे. मंदिराच्या कळसाच्या दर्शनावरच त्यांना संतुष्ट राहावे लागे. समाजव्यवहारातही त्यांना दोन हात दूर ठेवले जाई. देव, धर्म आणि मोक्ष यांपासून त्यांना वंचित करण्यात आले. पुरोहित वर्गाची मिरासदारी सुरू झाली. आंतरिक धर्मभावनेपेक्षा बाह्य आचरणाची प्रतिष्ठा वाढली. देवाधर्मात उपचारांना आणि साधनसामग्रीला प्राधान्य मिळाले.
आद्य शंकराचार्यांनी शिव, विष्णू,देवी, सूर्य आणि गणपती या देवतापंचायतनाची पूजा रूढ केली, तरी या देवतांच्या भक्त्तांचे मतभेद मिटले नाहीत. वेगवेगळ्या दैवतभक्त्तांना आपलेच दैवत श्रेष्ठ वाटे. त्यामुळे त्यांच्यात कलह माजत. शिवाचे उपासक (शैव) आणि विष्णूचे उपासक (वैष्णव) यांच्यातील धार्मिक तेढ पराकोटीला गेली होती. दोघांनीही परस्परविरुद्ध आचारधर्माचे अवलंबन करून हे वैर धुमसत ठेवले. अनेक कारणांनी विस्कळीत झालेला हिंदुसमाज या शैववैष्णववादाने अधिकच दुबळा झाला.
धर्माच्या प्रभावामुळे नामदेवकालीन समाजजीवनात कर्मकांडाचा अतिरेक झाला. व्रतवैकल्यांना उधाण आले. पुराणग्रंथातून व्रतांचा उद्भव झाला आणि पुढे या व्रातांवर स्वतंत्र धर्मशास्त्रे रचून त्यांचा विकास करण्यात आला. व्रतकौमुदी, व्रतार्क व्रतरज यांसारख्या ग्रंथांनी व्रतांची सशास्त्र मांडणी केली. या व्रतांची दृष्टी परमार्थापेक्श्का ऐतिकाकडेच अधिक आहे. यादवांचा श्रीकरणाधिप हेमाडपंत याने ` चतुर्वर्गचिंतामणी ' या नावाचा प्रचंड ग्रंथ लिहून त्यात व्रते, दाने इत्यादींची सविस्तर माहिती दिली. हेमाद्रीने एकेका तिथीला पाच-सहा व्रते सांगून प्रत्येक व्रत कसे करावे, पक्वान्ने कोणती करावी, किती ब्राह्यणांना भोजन घालावे याविषयी समग्र स्पष्टीकरण केले आहे. व्रते-उद्यापने यांसारख्या पारंपारिक गोष्टींत गढून गेल्यामुळे बदलल्या काळाची चाहूल समाजाला लागणे कठीण गेले.
रोजच्या अनेक व्रतांतील काही महत्वाच्या व्रतांना सणांचे स्वरूप आले. वर्ष प्रतिपदा, नागपंचमी, कृष्णाष्टमी, दिवाळी, होळी इत्यादी सणांचे विपुल उल्लेख नामदेवकालीन वाड;मयात आहेत.
बारसे, मुंज, विवाह, आदी कौटुंबिक संस्कारांना व्यापक सामाजिक बैठक लाभली होती. विवाहसमारंभ थाटामाटाने केले जात. अनुलोम आणि प्रतिलोम विवाह होत नसत. बहुपत्नीत्व समाजात रूढ होते. पुनर्विवाहाची चाल ब्राह्यणाखेरीज इतर वर्णांत प्रचलित होती.
एकत्र कुटुंब पद्धती समाजात सर्वत्र अस्तित्वात होती. कुटुंबातील सर्वांत वडील पुरूषाच्या मर्जीनुसार घरचा कारभार चाले. घराण्याच्या सर्व परंपरा अभिमानाने पाळल्या जात. स्त्रीचे जीवन मात्र पूर्णपणे पराधीन होते. घरातील कर्ते पुरुष आणि इतर आप्तमंडळी विधवा स्त्रियांवर सती जाण्याची सक्त्तीही करीत. सती न जाणाय्रा विधवेच्या वाट्याला सासरी वा माहेरी दु:खाचे डोंगर येत. कुटुंबात आणि समाजात स्त्रियांवर अनेक बंधने लादली होती. स्त्रियांच्या बाबतीत एकूण समाजाची भूमिकाच मुळी अनुदारपणाची होती. त्यांना कसलेच स्वातंत्र्य नव्हते. अस्पृश्याप्रमाणेच स्त्रियाही उपेक्षित होत्या.
वेदोपनिषदातील ज्ञान संस्कृत भाषेच्या दुर्गमतेमुळे आणि सामाजिक उच्चनीच श्रेणीमुळे सर्वसामान्यापर्यत पोचले नाही. साहजिकच रूढींनाच धर्माचे माहात्म्य आले. अज्ञानामुळे अंधश्रद्धा वाढीस लागल्या. अंगारेधुपारे, गंडेदोरे, तंत्रमंत्र, नवससायास म्हणजेच धर्म, असा समज निर्माण झाला. यातूनच बुवाबाजी उद्भवली. धर्मभोळेपणाला ऊत आला. सकामभक्त्ती करण्याकडे समाजाची प्रवृत्ती वळली. देवदेवतांना नवसाची प्रलोभने दाखविल्यास, आपल्या लौकिक इच्छा पुरतील असा अंधविश्वास बहुजन समाजाला वाटू लागला. पापग्रहांच्या शांतीसाठी होमहवन, दानधर्मादी कर्मे घडू लागली. ज्योतिषांच्याकडून प्रत्येक कार्यासाठी मुहूर्तांचे कौल घेण्यात येऊ लागले. कावळा, पिंगळा, घुबड, इत्यादी पक्ष्यांच्या दर्शनाने शकुनापश्कुन घडू लागले. स्वप्नांचे शुभाशुभत्व ठरवून त्यावरून भविष्यकलीन घडमोडींचे अंदाज वर्तविले जात. भूतपिशाच्चांवर लोकांचा पूर्ण विश्वास होता. अतृप्त आत्मे पीशाच्च होऊन वावरतात अशी समजूत होती. झडपणी, बाधा, वारे लागणे यांच्या चित्रविचित्र कथा लोकांना खय्रा वाटता. माणूस आजारी पडला तर त्याला बाधा झाली म्हणून उपचार सुरू होत. उतारे टाकण्यात येते. गावात रोगराई आली तर तो ग्रामदेवतेचा कोप मानला जाई. त्या देवतेचा कोप शांत करण्यासाठी जत्रा भरविण्यात येत आणि पशुपक्ष्यांचे बळी दिले. जात. लहान मुलांना, सुंदर स्त्रियांना, वेलीवृक्षांना दृष्ट लागण्याचे प्रकार घडत. मीठमोहरी उतरून टाकणे यासारखे तोडगे त्यावर करण्यात येते. दुष्ट दैवतांना वश करून जादूटोणा, जारणमारण करण्यात येई. विविध अंधश्रद्ध आणि रूढी यांनी पछाडल्यामुळे या काळातील सामाजिक जीवन गतानुगतिक झाले होते.
गतानुगतिकतेने जगणारा हा समाज नगरापेक्षा खेडोपाडी अधिक प्रमाणात पसरला होता. नामदेवकालात या ग्रामीण जीवनाची देखभाल गावगाडा करीत असे. पाटील, देशमुख, चौधरी, कुलकर्णी, वेसकर, अलुतेदार, बलुतेदार इत्यादी लहानमोठे वतनदार गावची व्यवस्था पाहात. या कामासाठी सरकारातून वा गावाकडून त्यांना वतने मिळत. कुटुंबातील आणि गावकय्रांतील तंटेबखेडे व लहानसहान गुन्हे याचा न्यायनिवाडा करण्याचे काम गावपंचायतीकडे असे. या गावपंचायतीत वेगवेगळ्या जातिजमातीमधील समाजमान्य व्यक्त्ती असत. त्यांचा निर्णय गाव मान्य करी आणि त्यांचा निर्णय गाव मान्य करी आणि त्यानुसार अपराध्याला शासन घडे. मोठ्या गुन्ह्यांच्या निवाड्यांसाठी मध्यवर्ती न्यायालये असत. पाटील व वेसकर हे वतनदार चोराचिलटांपासून गावची राखण करीत. या गावगाड्याच्या कारभारात राजसत्त फारसा हस्तक्षेप करीत नसे.
ग्रामीण जीवन शेतकीप्रधान होते. गावातील बहुसंख्य लोक शेतीच करीत. रोजच्या जीवनावश्यक वस्तू वाणी दुकानातुन विक्रीला ठेवीत. त्यांच्याकडे रोख पैसा असल्याने ते सावकारीही करीत. निष्क, गद्याण, होन, वीस, सुंक, आसू, दाम, रूका, कवडा इत्यादी नाणी चलनात होती. तेली, तांबोळी, साळी, माळी वगैरे अलुतेदार आणि सुतार, लोहार, कुंभार इत्यादी बलुतेदार आपापला कुलव्यवसाय करून व्यक्त्तीच्या व समाजाच्या गरजा भागवीत. विविध प्रकरची वस्त्रे, सोन्याचांदीचे निरनिराळे अलंकार, चित्रे, शिल्पे वगैरे त्या त्या व्यवसायातील कुशल कारागीर तयार करीत.
परंरागत आणि रूढिग्रस्त समजाला नवनव्या धर्ममार्गांनी नेण्याचे प्रयत्न, विविध धर्मसंप्रदाय, नामदेवांच्या कालातही करीत होते. जैन आणि बौद्ध यांचे एकेकाळचे धर्मतेज मंद होत आले होते. शांकर, रामानुज माध्व इत्यादी भिन्नभिन्न तत्त्वज्ञानप्रणालींतून विकसित झालेले धर्मसंप्रदाय, आपापल्या मतप्रचाराचे कार्य करीत होते. नाथ, लिंगायत, महानुभाव, वारकरी आदी धर्मपंथांचे आचार्य, लोकांना लोकवाणीतून धर्मोपदेश करीत, महाराष्ट्र-कर्नाटकातून संचार करीत होते.
मध्ययुगीन भारतीय धर्मक्षेत्रात नाथ संप्रदायाने आपला वैभवशाली इतिहास घडविला आहे. अनादि गुरू शंकरापासून या समप्रदयाची परंपरा सांगितली जाते. मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ या आद्य गुरुशिष्यांनी आपल्या सिद्ध वाणीने भारतात सर्वत्र या संप्रयाचा प्रचार केला. नाथ संप्रदायाने जातिभेदाच्या जातिभेदाच्या भिंती मानल्या नाहीत. ब्राह्यणापासून अंत्यजापर्यत सर्वांना आपल्या संप्रदायात प्रवेश दिला. समाधियोगावर आणि ब्रह्मचर्य्पालानावर या संप्रदायाचा विशेष भर दिसून येतो. लिंगायत, महानुभाव, वारकरी वगैरे धर्मसंप्रदायांवर नाथ संप्रदायाचा कमीअधिक प्रभाव पडलेला आहे.
गोविंद प्रभूंच्या प्रेरणेने आणि चक्रधरांच्या प्रवर्तनाने तेराव्या शतकात महानुभाव संप्रदाय उदयास आला. या दोघा महानुभाव महात्म्यांचा नाथ संप्रदायाशी निकटचा संबंध होता. हा संप्रदाय दत्तात्रयाने स्थापल्याचा उल्लेखही महानुभाव ग्रंथात मिळ्तो.या संप्रदायाने वेदप्रामाण्य नाकारले. मूर्तिपूजा अमान्य केली. हंस, दत्त, श्रीकृष्ण आणि श्रीचक्रधर हे चार युगांचे चार अवतार आणि श्रीकृष्णा, दत्तात्रय प्रभू, चांगदेव राऊळ, गुंडम राऊळ व श्रीचक्रधर हे पंचकृष्ण यांचा स्वीकार केला. गीता हा ग्रथ कृष्णोक्त्त म्हणून आणि भागवतात कृष्णवर्णन असल्याने, या दोन्ही ग्रंथाना संप्रदायाची मान्यता मिळाली. चक्रधरांची वचने हीच या संप्रदायाची वेदवचने होत. चक्रधररांनी परमेश्वराची नामभक्त्तीच साधकांना करावयास सांगितली. परमेश्वर आणि भक्त्त यांच्यांत नित्यच स्वामी-सेवक संबंध असतो, असे मानून, त्यांनी द्वैतवादाचा पुरस्कार केला. भिक्षा मागून उदरनिर्वाह या पंथीयांना करावा लागे. अहिंसेचे काटेकोर पालन करण्यावर या संप्रदायाने भर दिला. काळी वस्त्रे पांघरावीत, तरूच्या तळवटी रहावे, कदान्नची भिक्षा खावी, ब्रह्मचर्याने राहावे इत्यादी अटी महानुभाव भिक्षूंना सांभाळाव्या लागत. जातिभेदातीत होऊन स्त्रीपुरुषांना मुक्त्तप्रवेश या संप्रदायाने दिला. संस्कृत भाषा न वापरता मराठी भाषाच वापरावी, असा आदेश संस्कृत पंडितांनाही नागदेवाचार्य या संप्रदाय-प्रचारकांनी दिला आहे. मराठी भाषेप्रमाणेच महाराष्ट्राबद्दलही महानुभावीयांना जिव्हाळा होता. महानुभाव संप्रदायाची दीक्षा ही संन्यासदीक्षा असल्याने हा संप्रदाय समाजापासून बराच दुरावला. मात्र मराठी गद्यसाहित्य समृद्ध करण्याचे कार्य महानुभाव सांप्रदायिकांनी केले याची आठवण राखली पाहिजे.
नाथ, महानुभाव आदी धर्मसंप्रदाय महाराष्ट्रीय लोकजीवनाला नवे वळण देण्याचे कार्य करीत होते. वीरशैव म्हण्जेच लिंगायत पंथाने असेच कार्य कर्नाटकात आरंभलेले होते. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात बसवेश्वरांनी, रेवणसिद्ध, मराळसिद्ध आदींच्या परंपरेतून आलेल्या लिंगायत संप्रदायाचे व्यवस्थापन केले. रुढधर्मजीवन आणि कर्मकांड यांविरुद्ध वीरशैवांनी प्रखर आंदोलन उभारले. चक्रधरांप्रमाणेच बसेवेश्वरांच्या वचनांनाही धर्मतत्त्वांची प्रतिष्ठा प्राप्त झाली. शक्त्तिविशिष्ट शिवाद्वैताचा सिद्धांत या पंथाने मांडला. कर्नाटकातील लोकबोलीतून सर्वसामान्य जनतेला या संप्रदायाने धर्मोपदेश दिला. सर्व थरांतील लोक या संप्रदायाकडे आकर्षित झाले. दक्षिण महाराष्ट्रावर वीरशैव पंथाचा थोडाफार प्रभाव पडला.
खंडोबा, महालक्ष्मी, तुळजा भवानी, रेणुका, विठ्ठल इत्यादी देवदैवते महाराष्ट्रात प्रतिष्ठित झाली होती.
ज्या सांस्कृतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नामदेवांनी कर्तृत्व गाजविले, ती लक्षात घेतली की, त्यांच्या कर्तृत्वाचे तेज आणखीच लखलखून उठते.
|
|