|
|
नामदेव आता पाच-सहा वर्षाचा झाला. त्या वेळच्या समाज रुढी प्रमाणे तो लिहायला - वाचायला शिकू लागला. अधूनमधून वडिलांच्या कामात लुडबूड करु लागला. मागे सांगितल्याप्रमाणे दामाशेटी रोज पांडुरंगाला नैवेद्य दाखविल्याशिवाय स्वत: जेवत नसत. घरात स्वयंपाक झाल्यानंतर ते स्वत:च नैवेद्याचे ताट घेऊन जात व देवाला नैवेद्य दाखवीत.
एकदा त्यांना बाहेरगावी जायचे होते. त्यांनी नामदेवाला जवळ बोलावून घेतले आणि सांगितले; "आजपासून देवाला तू नैवेद्य घेऊन जात जा. नैवेद्य चांगला झाकून ने. अधे मधे त्यातले काही खाऊन नैवेद्य उष्टा करु नकोस. मी ज्याप्रमाणे आधी देवाला जेवू घालतो, मग मी जेवतो. ते तू लक्षात ठेव! देव जेवल्याशिवाय आपण जेवायचे नसते." सर्व सूचना दिल्या व ते गावाला गेले.
नामदेवांच्या आईने नैवेद्याचे ताट भरुन नामदेवाच्या हातात दिले. नामदेव नैवेद्याचे ताट घेऊन मंदिरात गेले. गाभाऱ्यात मूर्तीच्या समोर ते ताट ठेवून दिले. गाभाऱ्याबाहेर बसून देव नैवेद्य खाण्याची वाट पाहू लागल. त्याला वाटत होते, की आपले वडील रोज देवाला नैवेद्य घेऊन येतात म्हणजे देव नैवेद्य खात असला पाहिजे. शिवाय वडील म्हणाले होते, की देवाला जेवू घातल्याशिवाय मी जेवत नाही. याचा शब्दश: अर्थ नामदेवाच्या बाळमनाने घेतला होता.
थोडया वेळाने नामदेवांनी पाहिले, तर ताट तसेच भरलेले. आणखी थोडा वेळ थांबून वाट पाहिली. तरी ताट तसेच भरलेले. त्याला वाटले, रोज वडील नैवेद्य घेऊन येतात. आज आपण आलो, हे देवाला आवडलेले दिसत नाही; म्हणूनच देव जेवत नाही. मग त्याला वाईट वाटले. तो हात जोडून देवासमोर उभा राहिला. देवाला विनंती केली, " हे देवा, रोज वडील येतात; पण आजपासून नैवेद्य दाखविण्याचे काम त्यांनी माझ्यावर सोपविले आहे. तरी तू लवकर नैवेद्य खा."
विनंती करुन तो परत बाहेर येऊन थांबला. पुन्हा पाहातो, तो ताट तसेच, मुर्ती कुठे नैवेद्य खात असते का? पण नामदेवाला आता हे कसे काय समजावून सांगणार? त्याला वाटले, आपल्या हातून काहीतरी चूक घडली आहे, म्हणुनच देव नैवेद्य खात नाही.
तो परत हात जोडून देवाला म्हणाला, " देवा, माझे काही चुकले असले तर मी माफ़ी मागतो. पण मी खरेच सांगतो, मी सकाळी चांगली स्वच्छ अंघोळ केली आहे. नैवेद्य झाकून आणला आहे. त्यात धूळ-कचरा उडू दिला नाही. मी अजिबात कशालाही बोटसुध्दा लावून चाखून पाहिले नाही म्हणजे तो उष्टाही झाला नाही. तू आता लवकर नैवेद्य खा. मला घरी जायला उशीर होतोय. आई घरी माझी वाट पाहत बसली असेल."
तरीही देव जेवेना. शेवटी तो देवाला म्हणाला," देवा, मला उशीर झाला तर आई मला मारेल. तुम्ही नैवेद्य खात नाही. मी ताट तसेच नेले तर ती म्हणेल, तूच नीट नैवेद्य नेला नाहीस किंवा नीट नैवेद्य दाखविला नाही, म्हणून देव जेवला नाही. दोन्ही बाजूंनी माझी पंचाईत झाली आहे. तेव्हा आता जर का तुम्ही नैवेद्य खाल्ला नाही तर इथे तुमच्या पायावर डोके आपटून मी जीव देईन."
तरी देव जेवेना. मग मात्र तो खरे देवाच्या समोर बसला. आपले डोके देवाच्या पायावर आपटणार इतक्यात त्याचा खांदा धरुन कोणीतरी थांबवीत असल्याचे त्याला जाणवले. त्याने डोळे उघडून पाहिले, तर संपूर्ण गाभारा तेजस्वी प्रकाशाने भरुन गेला होता. मूर्तीमधून साक्षात देव बाहेर आले होते. पितांबर नेसलेला, अंगावर उपरणे घेतलेला, डोक्यावर सुंदर सोन्याचा मुकुट असलेला देव समोर उभा होता. त्याने नामदेवाने आणलेला नैवेद्य आनंदाने खाल्ला व परत गुप्त होऊन मूर्तीत जाऊन बसला.
नामदेव मोकळे ताट घेऊन परत आला. नामदेवाला यायला उशीर झाला म्हणून त्याची आई दारातच आई त्याची वाट पाहत थांबली होती. तो जवळ येताच आईने विचारले, " अरे नामदेवा, एवढा वेळ कुठं होतास ? आणि हे काय, ताट मोकळेच ? नैवेद्य कुठाय ? तूच देवळात बसून खाल्लास का कोठे सांडवून आला आहेस ?"
अगं आई, नैवेद्य देवानेच खाल्ला. रोज नैवेद्य बाबा घेऊन जातात, पण आज मी नैवेद्य नेला म्हणून आज पुष्कळ वेळ देव नैवेद्यच खाईना. शेवटी मी त्याला स्पष्ट बजावून सांगीतलं, की तू जर जेवला नाहीस तर तुझ्या पायावर डोकं आपटून मी जीव देईन. खरचं मी डोके देवाच्या पायावर आपटायला वाकलो तेव्हा कुठे तो समोर आला आणि त्याने नैवेद्य खाल्ला." नामदेव म्हणाला.
आई म्हणाली, " चल खोटा कुठला ? अरे देव कुठे नैवेद्य खातो कां? अरे ती पाषाणाची मूर्ती, माणसासारखे तिला थोडेच खाता येते ?"
"अगं आई, खरचं देवानं नैवेद्य खाल्ला." नामदेव परत म्हणाला.
आई म्हणाली, " नामदेवा, खोटं बोलू नये हं! खोटं बोलणारास देव शिक्षा करतो. बर नैवेद्य दाखवायच्या आधी खाल्लास की नैवेद्य दाखवून झाल्यावर, ते तरी सांग."
आपल्यावर आईचा विश्वास बसेना हे पाहून नामदेव म्हणाला, " अगं आई, मी खरंच सांगतो, नैवेद्य मी खाल्ला नाही, सांडवलाही नाही; तर खरंच देवानंच खाल्ला, अगदी पांडुरंगाची शपथ!"
तसं आई घाईने म्हणाली, "अरेरे, नको, देवाची शपथ घेऊ नको. तू नक्की खोटं बोलत नाहीस. पण उद्या नैवेद्य घेऊन जातात बाबांना बरोबर घेऊन जा आणि त्यांना बघू दे, की तुझ्यासमोर देव कसा जेवतो ते."
नामदेवांचे वडील संध्याकाळी परत आल्यावर नामदेवाच्या आईने दुपारचा प्रकार त्यांनी सांगितला व उद्या त्याच्यासोबत जाऊन नामदेव नैवेद्याचे काय करतो ते पहाण्यास सांगितले.
त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी नामदेव नैवेद्य घेऊन निघाला. सोबत वडील होते. मंदिरात गेल्यावर नामदेव गाभाऱ्यात गेला. वडील एका खांबाआड उभे राहून पाहत होते. नामदेवाने नैवेद्य देवासमोर ठेवला. हात जोडून वंदन केले. म्हणाला, " देवा, आज आता लवकर या. काल मला परत जायला उशीर झाला. आई रागावली. देवानेच नैवेद्य खायला उशीर लावला; पण शेवटी नैवेद्य खाल्ला म्हणून सांगितले; तर माझ्यावर विश्वासच ठेवला नाही. देवा, आज लवकर या आणि नैवेद्य खा. ताट तसंच परत घेऊन गेलो तर तुमच्यामुळे मी खोटारडा ठरेन."
थोडा वेळ वाट पाहिली देव जेवत नाही, असे पाहून नामदेव परत म्हणाला, " देवा, आज मी जास्त वेळ थांबणार नाही. हे पाहा, आताच मी डोके फ़ोडून घेतो तुमच्या पायावर." तो डोके आपटणार तेवढ्यात कालच्याप्रमाणेच मूर्तीतून देव प्रकटले. गाभाऱ्यात अप्रतिम तेज पसरले. साक्षात देवाचेच रुप नामदेवांचे वडील दुरुन पहात होते.
देव नामदेवाला म्हणाला, " नामदेवा तू भोळा आहेस. आज आणि फ़क्त आजच मी जेवतो; पण असा रोज हट्ट करुन बसायचे नाही हं! अरे, माझ्यासमोर नुसता नैवेद्य ठेवून नमस्कार केला तरी तो मला पोहोचतो. त्याच्या नुसत्या वासाने माझे पोट भरते. तेच ताट घरी नेऊन सर्वांनी खाल्लं की मला तृप्तीचा ढेकर येतो." देव जेवला. ताट मोकळे झाले.
हे सारं बघून नामदेवाच्या वडिलांना काहीच सुचेना. त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरुन गेले. ओठ, हात थरथर कापत होते. नामदेव ताट घेऊन बाहेर आला. वडिलांजवळ येताच ते भानावर आले. त्यांनी अतिशय आनंदाने नामदेवाला कुरवाळले. आज नामदेवामुळे त्यांना साक्षात वैकुंठीचे निधान पहायला मिळाले होते. हा मुलगा साधा नाही, असामान्य आहे. केवळ सहाव्या वर्षी दगडाच्या देवाला जेवू घालण्याचे सामर्थ्य याच्यात आहे. हा नक्कीच पुढे कोणी अलौकिक होणार, नाव कमविणार, याची खात्री त्यांना आज पटली होती.
घरी येऊन त्यांनी गोणाईला पाहिलेला प्रसंग सांगितला. तिने नामदेवाला अतिशय प्रेमाने कुशीत घेतले. त्याला कुरवाळले. गुणाचे बाळ म्हणून पटापट कितीतरी पापे घेतले. मग दामाजीला म्हणाली, " माझा नामदेव मोठा धीट हे खरे आहे, पण तुम्हीही भाग्यवान आहात. आज याच्यामुळे का होईना पण तुम्ही साक्षात पांडुरंगाचे दर्शन घेऊ शकलात. आपले जीवन धन्य झाले. कृतार्थ झाले!"
या प्रसंगाचे वर्णन करणारा एक अभंग त्यांनी आपल्या गाथेमध्ये लिहून ठेवला आहे. ते म्हणतात -
आम्ही हाटा जाऊं लवकरी येंऊ / नैवेद्य पाठवू नाम्या हाती //
दुसरे दिवशी नैवेद्य धाडिला / दामाजी शेटी गेला त्याच्या मागे //
जाऊनिया नामा उभा राहे सन्मुख / म्हणे विठोबास जेवीं बापा //
देव म्हणू नामा बसावे द्वारात / लवकरी जेवितों पाही आतां //
जेवूनिया देवें हाती दिधली वाटी // तेव्हा दामा शेटी काय बोले
//
बारा वर्षे तुज उपवासी मारिले / आणि जेवविलें नामदेवे //
अशा तऱ्हेने केवळ वयाच्या सहाव्या वर्षीच महान आध्यात्मिक शक्तीचा दाखला नामदेवाच्या वडिलांनी पहिला होता. बोलबोलता य प्रसंगाची माहीती गावात अनेकांना समजली. लोकांना नवल वाटले. त्यांच्या मनात नामदेवाबद्दलचा आदर वाढला. कोणी त्याला देवाचा अवतार मानू लागले, तर कोणी त्याला देवाचा लाडका भक्त मानू लागलो. बाळपणीच त्याला संत मानू लागले.
दामाजी गोणाईला म्हणाले, " चला, आता माझी काळजी मिटली. आता माझी खात्री पेटली, की प्रत्यक्ष पांडुरंगच आता नामदेवाची काळजी घेईल आणि जनीची काळजी नामदेव घेईल. आता देवाकडे माझं दुसरं काही मागणं नाही."
|
|