|
|
संत नामदेवांचा काळ म्हणजे इसवी सनाचे बारावे शतक. तसा हा काळ सामाजिक क्रांतीचाच
होता. त्या काळात महाराष्ट्रात यादव घराण्यातील राजांचे राज्य होते. यादव
म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या वंशातील इ.स.११८७ पासून महाराष्ट्रात यादव
स्वतंत्र सम्राट झाले.
पाचवा भिल्लम राजा हा या वंशातील. अलीकडच्या काही शतकातील पहिला पराक्रमी
राजा. त्याच्यापुर्वी अठरा पिढ्या यादवांचे राज्य चालू होते. या पाचव्या
भिल्लम राजाने त्या राज्याचा विस्तार केला. त्याचे साम्राज्य केले. या भिल्लम
राजानंतर यादव कुळात जैत्रपाल, सिंधण जैत्रपाल, कृष्णदेवराय महादेव राय यांच्यासारखे
अनेक शूर व पराक्रमी राजे होऊन गेले.
इ.स.११८७ मध्येच भिल्लम राजाने कल्याणी चालुक्यांचा पराभव केला. त्याने आपले
स्वतंत्र राज्य स्थापन करुन देवगिरी येथे आपली राजधानी केली. देवगिरीच्या
राजधानीमुळे मराठवाडयाचे वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण असे स्थान निर्माण झाले
होते. या राज्याचा धाक, दबदबा सर्वत्र पसरलेला होता. त्याप्रमाणे त्याचे
वैभवही होते.
या मराठवाडयात हेमाडपंत, बोपदेव, भास्कराचार्य असे अनेक महापंडित होऊन गेले.
सर्वांनाच देवगिरीच्या राजांचा आश्रय होता. हेमाडपंत उर्फ़ हेमाद्री यांनी
व्रतवैकल्ये, दान, तीर्थयात्रा यांचे वर्णन करणारा एक उत्तम ग्रंथ लिहिला.
त्याचे नाव 'चतुर्वर्ग चिंतामणी' असे होय. याशिवाय त्याने बांधून घेतलेल्या
मंदिरांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे अशा प्रकारच्या बांधकामाच्या मंदिरांना
'हेमाडपंती मंदिर' असे संबोधले जाते. बोपदेव या पंडिताने यादव राजांचा गौरव
करणारा 'राजप्रशस्ती' नावाचा ग्रंथ लिहिला. भास्काराचार्य हे महान ज्योतीषशास्त्रज्ञ
व गणिती होते. त्यांनी जगात गणित विषयाला फ़ार मोठी देणगी दिली आहे.
या काळात उपासनेचा, भक्तिमार्गाचा उदय झाला होता. कर्मकांडाचे प्राबल्य वाढू
लागले होते. वैदिक धर्माचा विस्तार झाला होता. अनेक कला, अनेक शास्त्रे,
विद्या, शास्त्रीय ग्रंथ यांची निर्मीती झाली होती. तसेच या सर्वांचा विकाससुध्दा
झाला होता. वैद्यकशास्त्र, संगीतशास्त्र, धर्मशास्त्र, राज्यशास्त्र, वेदशास्त्र
अशा विषयांवर ग्रंथ रचना करण्य़ात आलेली होती. या शास्त्रांच्या परंपरासुध्दा
निर्माण झाल्या होत्या.
यादव राजांनी राज्यविस्ताराबरोबरच सांस्कृतीक जीवनसुध्दा समृध्द करुन टाकले
होते. धार्मीक दृष्टीनेही महाराष्ट्राची भरभराट झाली होती. रामदेवराय या
राजाच्या काळात तर सांस्कृतिक क्रांतिपर्वाचीच महाराष्ट्रात सुरुवात झाली
होती. लोक व्रतवैकल्याकडे वळले होते. नाथ, वारकरी, महानुभव, लिंगायत असे
अनेक पंथ याच काळात उदयास आले. हेमाद्रा हा पंडित तर वैदीक धर्माच्या पुनरुत्थानाच्या
कार्यात गुंतला होता.
या काळातील ब्राम्हण लोक, श्रौत व स्मार्त लोक कर्मकांडाचा आदर करीत; तर
जैन, श्रवण, नाथ, योगी, संन्यस्त जीवन जगण्यात कृतार्थता मानीत होते. ब्राम्हण
नसलेले लोक अध्यात्माकडे वळले, तर वैदीक धर्माचे विचारवंत ब्राम्हणांपुरतीच
आपली दृष्टी मर्यादित ठेवत होते. ब्राम्हण कर्मकांडावर जोर देत होते. समाजासाठी
आवश्यक असलेल्या नीतिमुल्यांची जोपासना करण्याची कुवत त्यांच्यात नव्हती.
त्यामुळे सामाजिक जीवनात दुरवस्था निर्माण झाली होती.
राजा रामदेवरायाच्या काळातच पैठण हे महाराष्ट्राचे धर्मापीठ बनले होते. अनेक
विद्वान पंडित येथे अध्ययन करीत असत. या धर्मपीठाच्या विद्वान पंडितानांच
संत ज्ञानेश्वरांनी आपले आध्यात्मिक तेज दाखवून चकीत करुन टाकले. तसे ज्ञानेश्वरांचे
आईवडील मराठवाडयातील आपेगावचेच. मराठवाडयातील संत एकनाथ, जनाबाई, नामदेव,
विसोबा खेचर यांनी भागवत धर्मावरच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रावर विशेष
छाप पाडली आहे. रामायणातील सीतेचा संबंध याच भूमीशी दाखविला जातो. गोदावरी
नदी म्हणजे या भूमीतील लोकजीवनाची आणि सांस्कृतिक जीवनाची नाडीच होय.
अशा या भूमीत इ.स. १२७० मध्ये राजा रामदेवराय राज्य करीत असताना उत्तरेकडून
मुस्लिम राजांनी महाराष्ट्रावर चाल केली. यांपैकी पहिला आक्रमणकारी म्हणजे
क्रूरकर्मा अल्लाउद्दीन खिलजी होय. त्याच्यानंतर मलिक काफ़ूर, मुबारक खिलजी
यांनी आक्रमणे केली. इ.स. १३१२ मध्ये वैभवशाली अशा यादव राज्याचा शेवट झाला.
रामदेवराय हा यादवांच शेवटचाच राजा ठरला.
वेगवेगळ्या पध्दतीने विचार करता असे म्हणता येईल, की राज्याचा परमोत्कर्ष
झाला. तो सुवर्णकाळ होता. अर्थात राज्यात सर्वत्र आबादी आबाद होती. समृध्दी
ओसंडून वहात होती. अशा वेळी जनतेत ऎषाआरामीपणा, विलासी जीवन जगण्याची वत्ती
आली नाही तरच नवल! अशा वेळी पौरुषेय, पराक्रम लयाला गेल्याशिवाय रहात नाही
आणि माणूस जेव्हा स्वत: पराक्रम करेनासा होतो, तेव्हा तो परमेश्वरावर अवलंबून
रहायला लागतो. आपल्या कार्याच्या सिध्दीसाठी परमेश्वराला साकडे घालायला लागतो.
त्या परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी उपासना व कर्मकांड करु लागतो.
पण संतांनी मात्र अशा समाजाला जागृत करण्याचे, त्यांच्यात नवचैतन्य भरण्याचे
काम केले.
|
|