Send Free Marathi Greeing Cards Namdeo Shimpi Marathi Greetings  
About NSS Contact NSS FAQ Join NSS
 
NamdeoShimpiSamaj.org  
  Welcome Guest Sign | Register  

   
  News   Events   Articals   Dictionary   Matrimonial   Saint Namdeo Maharaj  
Site
   
 
  NamdeoShimpiSamaj.org >> Saint Namdeo Maharaj >> Jeevanvrutta Back | Home
    Send to your friends Send | Print this page Print
  जीवनवृत्त
ग. वि. कविटकर
 

जन्मकथा
नामदेवांच्या पूर्वीच्या सहा पिढ्या परभणी जिल्ह्यातील आवंढ्या नागनाथपासून आठ-दहा कोसांवर हिंगोली तालुक्यातील नरसी बामणी (नरसी) नावाच्या गावी झाल्या.
पंढरीचा पांडुरंग हे नामदेवांच्या कुळातील आराध्यदैवत व ग्रामदेव नरसिंह हे कुलदैवत समजले जात असे. नृसिंव्ह-नरसिंव्ह-नरहरि- नरकेसरी-केसरीराज-केसीराज अशी केसी (शी) राज या शब्दाची व्युत्पत्ती असून केशीराजाच्या स्तुतिपर अनेक उद्‍गार नामदेवांच्या अभंगांत ठिकठिकाणी आढळतात. नरसी या गावी केशवदेवाचे (केशीराजाचे) मंदिर आहे.
नामदेवांच मुळ पुरुष यदुशेट शिंप्याचा व्यवसाय करी असत आषाढी-कार्तिकी पंढरीची वारी नियमाने त्यांच्या घराण्यात होत होती. ``आम्हा कीर्तन कुळवाडी / आणिक नाहीं उदीम जोडी //'' हा नामदेव गाथेतील कुलवृत्तीचा उल्लेख स्पष्ट आहे. नामदेवांचे पूर्वज भक्त्तिसंप्रदायी होते. आनुवंशिक गुणांच्या वाढीचा मनोरंजक इतिहास एकाच कुळातील अनेक पिढ्यांच्या सूक्ष्म निरीक्षणाने पाहावयास मिळतो. सागरात सर्वात मोठी जी लाट असते तिच्यामागे असंख्य लहान लहान लाटा असतात. पुढील मोठी लाट म्हणजे मागाहून येणाऱ्या लाटांचे एक सामुदायिक स्वरुप असते. त्या दृष्टीने अनेक पिढ्यांच्या सद्‍गुणांचा विकास ज्या व्यक्त्तीत पूर्णत्वात पोहोचलेला असतो, अशा व्यक्त्तींच्या कुळथेत या आनुवंशिक गुणांच्या परंपरेची माहिती मिळण्यासारखी असते. नामदेवांची कुळकथा म्हणजे त्यांच्या ठिकाणी विकसित झालेल्या भक्त्तीच्या उत्कर्षाचा इतिहास होय. यदुशेट विठ्ठलभक्त्त होते. पंढरीची नित्यनेमाने वारी करण्याच्या त्यांच्या क्रमात कधीही खंड पडत नसे. यदुशेटीचा मुलगा हरिशेट व नातू गोपाळ, गोपाळशेटीस गोविंद व राघव आशी दोन अपत्ये होती. त्यांनी पंढरीच्या वारीचे परंपरागत कार्य अव्याहत चालू ठेवले. गोविंदशेटीने आपले सर्व आयुष्य हरिचिंतनात घालविले. त्यास जिवाजी व नरहरी अशी दोन मुले झाली. त्यापैकी थोरले नरहरीशेटी हे नामदेवांचे आजोबा होत. त्यांच्या पोटी परभक्त्त दामाशेटी जन्मास आले. कल्याणीचा गोमाशेटी आणि त्याची कांता उमा यांच्या पोटी झालेल्या गोणाईशी त्यांचे लग्न झाले. उभयतांची गोत्रे अनुक्रमे भारद्वाज व गाधिज अशी होती. गोणाईची आई नृसिंहोपासक होती--
कल्याणींचा सिंपी हरिभक्त्त गोमा / त्याची कांता उमा नरहरिभजनीं //
सरिता सुकृताची त्या पोटीं उत्पन्न / जाली संबोधन गोणाबाई //
गोणाई दामासेठी जालें पाणिग्रहण / संसारी असोन नरसी गांवीं //
गोत्र संज्ञा ऐका पूर्वजांची सहज / गाधिज भारद्वाज दोनी कुळें //
आऊबाई कन्या जाली गोणाईसी / पुढें देवा नवसी पुत्रासाठीं //
नामा म्हणे होतें विठोबाचे मनीं / तेचि नित्य जननी नवस करी //
कह्राडनजीक कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले श्रीक्षेत्र कोळे नरसिंहपूर हे नामदेवांच्या पूर्वजांचे गाव होय असे एक मत आहे. परंतु हे मत आधुनिक काळात प्रसिद्ध झालेल्या संशोधन वृत्ताचे आलोचन केल्यास संशयास्पद असल्याचे ध्यानी येईल. कारण परभणी जिल्ह्यातील नरसीच्या परिसरातील नामदेवांचे अजोळ कल्याणी (काणणी) हे बामणीपासून तीन कोसांवर व ज्या गावी नामदेवांना गुरूपदेश झाला, तो आवंढ्या नागनाथ नरसीपासून आठ-दहा कोसांवर आहे. त्याप्रमाणे नामदेवांच्या जीवनाशी संबंधित असलेली गावे क़रादनजीक वसलेल्या नरसिंगपुराचे परिसरात दाखविता येत नाहीत.
या नरसी गावी असताना दामाशेटीस प्रथम आऊबाई नावाची कन्या झाली. या कन्येनंतर मुलगा नाही म्हणून आपले इष्ट दैवत विठ्ठल याच्या प्रेमाने आकर्षित होऊन, शेवती शके ११८० च्या सुमारास पंढरपुरास जाऊन त्यांनी तेथेच कायमचे वास्तव्य केले. तेथे पुत्रप्राप्तीसाठी गोणाई मनोभावे पांडुरंगास नवस करू लागली. दामाशेटी व गोणाई पंढपुरात ईशचिंतनात कालक्रमण करीत असत. निरंतर भगवंताचे अनन्यभावे नामस्मरण आणि गुणगान हा त्यांचा छंद. नामदेवास जन्म देणाऱ्या मातेची हीसुद्धा एक प्रकारची तपस्या होती आणि ती पुढील घटनेस साजेशीच होती. शेवटी गोणाईची ईशसेवा फलद्रूप झाली. ज्याची ती उत्कंठेने वाट पहात होती तो पुत्रजन्माचा दिवस उजाडला आणि तिच्या पोटी शके ११९२, प्रमोदनाम संवत्सरे, कार्तिक शुक्ल ११,रविवारी (दिनांक २६ ऍक्टोबर १२७०) सूर्योदयास नामदेवांचा जन्म झाला. आत्मचरित्रपर अभंगात नामदेव लिहितात-
अधिक ब्याण्णव गणित अकरा शेतें / उगवतां आदित्य तेजोराशी //
शुक्ल एकादशी कार्तिकी रविवार / प्रमोद संवत्सर शालिवाहन सक //
पंचांगनिर्णयाप्रमाणे हा काल बरोबर आहे. नामदेवांच्या काही अभंगगाथांतून `प्रभव संवत्सर शालिवाहन शके' असे म्हटले आहे, ते चुकीचे आहे. त्या जागी `प्रमोद संवत्सर शालिवाहन शक' असा पाठ पाहिजे, असे गणितावरून आणि वारकरी सांप्रदायिक शुद्ध पाठावरून म्हणता येते.
विष्णुदास नामदेवांच्या `नामदेवाची आदि ' या शके १६६६ पूर्वी लिहिलेल्या एका प्रकरणात नामदेवांचा जन्म पंढरपुरी झाला असे म्हटले आहे-
नामा तोचि उद्धव द्वापारी / कलियुगीं प्रत्यक्ष नामा अवधारी /
भक्त्तिकारणे निरंतरी / पंढरपुरीं जन्मला //
यावरून परभणी जिल्ह्यातील नरसी नामदेवांचे जन्मस्थान नसून पंढरपूर येथेच ते जन्मास आले होते असा निष्कर्ष नवीन उपलब्ध झालेल्या माहितीवरुन काढता येतो.
संतचरित्रकार महीपतीने पुराणातील कथांप्रमाणे नामदेवांची जन्मकथा भक्त्तिविजयात सांगितली आहे. ते कथन असे- दामाशेटींना परमेश्वराने स्वप्नात सांगितले की,तू कार्तिक शुद्ध एकादशीस भीमातीरावर थांब. तुला एक मोठा शिंपला भीवरेच्या प्रवाहात वाहताना दिसेल.तो शिंपला घेऊन घरी जा. त्यातून पुत्ररत्न निपजेल. त्याप्रमाणे स्नानादी नित्यकर्मे आटोपून दामाशेटी भीमातटाकी उभे असता एक वाहत येणारा शिंपला त्यांनी उघडला. पाहातात तो त्यातून नवजात बालक प्रकट झाले. हेच पुढे `नामदेव' नावाने प्रसिद्धीस आले.
आपणास पूज्य असलेले थोर पुरुष अयोनिसंभव होते असे मानण्याची प्रवृत्ती अन्य देशांप्रमाणे भारतातही देसून येते. याची सत्यता जीझस ख्राइस्ट, सीता, कबीर, नामदेवांच्या चरित्रातही चांगली प्रत्ययास येते. एकंदरीत पाहाता महीपतीने निवेदन केलेला हा कथाभाग विचाराच्या आणि आधुनिक विज्ञानाच्या कसोटीला मुळीच उतरत नाही. यास्तव वारकरी पंथाचे लोक या अवास्तव कथेवर विश्वास ठेवीत नाहीत.
शिवाय संत नामदेवांनी आत्मचरित्रात `शिव' शब्दावर सहजसुंदर श्लेष साधून संक्षेपाने आपला जन्म, कुळ, व्यवसाय, इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत. तो अभंग असा--
सिंपियाचे कुळीं जन्म माझा जाला / परि हेतु गुंतला सदाशिवीं //
रात्रिमाजीं सिवी दिवसामाजीं सिवी / आराणूक जीवीं नोव्हे कदा //
सुई आणि सुतळी कात्री गज दोरा / मांडिला पसारा सदाशिवीं //
नामा म्हणे सिवीं विठ्ठोबाची अंगीं / म्हणोनियां जगीं धन्य जालों //
दुसऱ्या एका ठिकाणी `प्रसवली माता मज मळमूत्री' असे आपल्या जन्मासंबंधी ते म्हणतात.
नामदेवांच्या जन्म देणारी त्यांची माता गोणाई म्हणते--
नवमासवरी म्यां वाहिलासी उदरीं //
गोणाई म्हणे नाम्या राहिलासी उदरीं / तैंहुनि मी करीं आस तुझी //
जनाबाई म्हणते--
गोणाईनें नवस केला / देवा पुत्र देई मला //
शुद्ध देखोनियां भाव / पोटीं आले नामदेव //
असे अनेक आधार देता येतील. त्यांच्या विचित्र जन्मकथेसंबंधाने दिलेल्या पूर्वोक्त्त माहितीपेक्षा हे त्यांचे अभंग विशेष विश्वसनीय होत.
गृहजीवन
नामदेवांच्या घराण्यात विठ्ठलभक्त्ती पूर्वापार चालत आली असल्यामुळे अगदी बालपणापासून त्यांना विठ्ठलभक्त्तीचा छंद जदला होता. अर्भकावस्थेतच बोलण्याचा प्रारंभ `विठ्ठल विठ्ठल' अशा नाममंत्राने झाला. संत एकनाथ म्हणतात--
पंचवरुषी नामा जाहला / छंदु विठूचा लागला /
एकाजनार्दनी सार / मंत्र जपे त्रिअक्षर //
अशा तऱ्हेने नामदेवांचे विठ्ठलप्रेम लहानपणापासून दुथडी ओसंडून बाहात होते. पांडुरंग मूर्तीला ते पाषाणमूर्ती न समजता साक्षात आनंदघन मानीत. या बालभक्त्ताच्या प्रेमपाशात तो आनंदघन पूर्णपणे गोवला गेला होता. या संदर्भात नामदेवांच्या बालपणीची एक आख्यायिका संगतात ती अशी--
नामदेवांच्या वडिलांचा असा एक नेम होता की, दररोज पूजा करून पांडुरंगाला ते नैवेद्य दाखवीत असत. एक दिवस दामाशेटीला कामाकरिता बाहेरगावी जावयाचे होते. म्हणून त्यांनी नामदेवाला देवळात जाऊन पूजा करावयास व नैवेद्य न्यावयास सांगितले. दुसऱ्या दिवशी नामदेव नैवेद्य घेऊन देवळात गेले व नैवेद्य खाण्याविषयी त्यांनी देवाची हात जोडून प्रार्थना केली. पण देव नैवेद्य खाईना. नामदेवांनी पुन्हा देवाला प्रार्थना केली, ``देवा, तूं जर आज नैवेद्य खाणार नाहीस, तर मी येथुन हालणार नाही.'' असे बोलून ते तेथेच बराच वेळ बसले. भगवंतांनी नामदेवांची परीक्षा पाहाण्याचे ठरविले. बराच वेळ झाल्यावर नामदेव देवाला म्हणाले, ``विठोबा, तू जर नैवेद्य खाणार नाहीस तर मी तुझ्या पायावर डोके आपटून प्राण देईन.'' जरा वाट पाहून देव नैवेद्य खात नाही असे पाहाताच नामदेव डोके आपटणार तोच भक्त्तवत्सल भगवंताने त्याला धरले व नैवेद्य आनंदाने खाल्ला.
नामदेवांचे जुने-नवे चरित्रकार वरिल अलौकिक घटनेचा निर्देश करीत आले आहेत. ही घटना जरी चमत्कारपूर्ण मानली गेली असली, तरीसुद्धा या प्रकरणावरून बालनामदेवांच्या भोळ्या, श्रद्धाळू मनाचे दर्शन होते आणि या घटनेच्या प्रकाशात त्यांच्या भावी जीवनात क्रमशः घेडलेल्या इतर घटनांचा अर्थ समजून घेण्यास मनाची तयारी होते.
हा बालभक्त्त सर्वकाल पांडुरंगाच्या भक्त्तीत दंग असे. हे पाहून दामाशेटी व गोणाई चिंतातुर झाली. नामदेवाने संसाराकडे लक्ष द्यावे व उद्योगधंदा करावा ही त्यांची इच्छा. म्हणून त्यांच्या वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी गोविंदशेट यांची मुलगी राजाई हिच्याशी त्यांचे लग्न लावून दिले. तिच्यापासून नारायण, महादेव, गोविंद आणि विठ्ठल हे चार मुलगे व लिंबाई नावाची एक मुलगी अशी पाच अपत्ये त्यांना झाली. अशा प्रकारे नामदेवांचा संसार, कुटुंबाच्या गरजा, त्यांचा आईच्या आशाआकांक्षा वाढत चालल्या. याउलट, नामदेव संसाराविषयी विरक्त्त व भगवद्‍भजनी आसक्त्त होत चालले. नामदेवांच्या घरातील परिवारात--
गोणाई राजाई दोघी सासू सुना / दामा नामा जाणा बाप लेक //
नारा विठा गोंदा महादा चवघे पुत्र / जन्मले पवित्र त्याचे वंशीं //
लाडाई गोडाई येसाई साखराई / चवघी सुना पाही नामयाच्या //
लिंबाई ती लेकी आऊबाई बहिणी / वेडीपिशी दासी त्याची जनी //
एवढ्या मोठ्या संसाराची जबाबदारी नामदेवांनी घ्यावी असे कुटूंबातील मंडळींना वाटे. पंरतु त्यांना विठ्ठलाचाच एकमेव ध्यास होता. त्यामुळे घरच्या मंडळींना प्रपंच आवरणे कठीण झाले.
नामदेव विठ्ठलमंदिरात जात. तेथेच नामस्मरण करीत. विठ्ठलाच्या मूर्तीजवळ आपले हितगुज सांगत. आपणच देव आणि आपणच नामदेव अशा प्रकारे संभाषण करीत. एकदा गोणाई स्वयंपाक करून नामदेवांची वाट पहात बसली, पण नामदेवांचा काही पत्ता नाही. तेव्हा संतापाने अगदी लाल होऊन त्यांना पाहण्याकरिता ती देवळाकडे गेली. तेथे पाहते तो नामदेव जणू काय चित्रातील पुतळ्यासारखे देवापुढे उभे. रागाच्या भरात तिने त्यांना हाताने ओढले मात्र, तोच ते प्रेतासारखे जमिनीवर धाडकन्‌ पडले. त्याची ही अवस्था पाहून त्या प्रेमळ माउलीचा राग जागच्याजागी जिरला. अंतःकरण गहिवरून आले. त्यांना पोटाशी धरून ती रडू लागली. नामदेवांनी सावध होताच तिला प्रेमलिंगन दिले, पण लागलेच ते तिला म्हणाले, ``आई, मी विठ्ठलाच्या ध्यानात मग्न असता, तू त्याची आणि माझी अशी ताटातूट केलीस म्हणून तू माझी आई नव्हेस.'' गोणाई म्हणाली, ``नामदेवा, अरे काय म्हणतोस हे? नऊ महिनेपर्यत पोटात वागवून तुला लहानाचा मोठा केला, तो एवढ्याकरिताच काय ? अरे बाबा, या विठोबाचा नाद सोड. याने कधी कोणाचे बरे केले नाही. आपला संसार बुडवू नकोस. काही परक्रम करून जन्माचे सार्थक कर. लौकिकाची काही चाड धर शिवण्याटिपण्यावर तू पाणी सोडलेस. घराकडे ढुंकून पाहात नाहीस. ही तुझ्या भक्त्तीची तऱ्हा तरी कोण बाबा?''
अन्नेसी उपवासी बैसलासी येथें / काय देईल तूंते विठ्ठल हा //
जनिताअ जीवविता सर्वज्ञ प्रतिपाळीता / आदणी सांभाळितो चराचरीं //
एक पांड्रंग दुजा नाहीं चांग / म्हणुनि याचा संग धरिला माते //
तेव्हा तू माझी काळजी करू नकोस.''
नामदेव ऐकत नाही, असे पाहून गोणाईने आपला मोर्चा पांडुरंगाकडे वळविला. ती म्हणाली, ``विठ्ठला, आम्ही तुझी काडीचीही ओशाळी नसता, तू माझ्या मुलाला असा अगदी वेडापिसा करून का सोडलास? बऱ्या बोलाने माझे पोर माझ्या स्वाधीन कर, याच्या हातात भोपळा देऊन तू आम्हांला मात्र भिकेची पाळी आणलीस? कसली रे मेल्या तुझी दया? हे पाहा, `जीव मी देईन,की नामा नेईन' हाच माझा निश्चय. अहो राही रखमाई, तुम्हाला साक्ष ठेवून मी सांगते की, मी नामा नेईन.''
आईचे हे बोलणे ऐकून नामदेव म्हणाले, ``आई, पुढे काही लाभ होईल या आशेने तुम्ही मला पांडुरंगाच्या चरणापासून दूर ओढता, पण जन्ममरणाच्या दुःखाने होरपळून गेलेल्या माझ्या मनाचा नुसता विचारही तुमच्या मनात येत नाही, याला काय म्हणावे? तुम्ही सारी माणसे माझ्या सुखाचे वाटेकरी आहात, दुःखाचे कोणी वाटेकरी होत नाही. म्हणूनच मी पांडुरंगाचे पाय धरून सर्वस्वी त्याचा झालो. तो माझे विश्रांतिस्थान आहे. त्याचे गुणगान करण्यात मला आनंद वाटतो. आई, मी तुला माझ्या अगदी मनातील गोष्ट सांगतो--
काया वाचा मनें ममत्व माझ्या ठायीं / तें तूं ठेवी पायीं विठोबाचे //
माझ्यावर जे तू एवढे कायावाचामनाने प्रेम करतेस, तेच प्रेम श्रीविठ्ठलाच्या ठिकाणी कर, म्हणजे तो तुला केव्हाही अंतर देणार नाही.''
गोणाईला अर्थातच हा उपदेश खपला नाही. शेवटी रागाच्या भरात नामदेवाची व विठ्ठलाची मनसोक्त्त निर्भर्त्सना करून ती म्हणाली, ``नामदेवा'',--
तुज नेल्यावांचून नथ जाय येथून / पंढरी गिळीन विठोबा सहित //
आपल्या उपास्यदेवतेची यापेक्षा अधिक निंदा नको, असा विचार करून नामदेव आईबरोबर घरी निघुन गेले.
गोणाई-नामदेवांचा हा संवाद करुनरसपूर्ण आहे. वैतागाच्या भरात गोणाई कधी मर्यादा सोडून बोलते, कधी देवाला बोल लावते,`माझे बाळ कां केले वेडे' व`तुझे काय खादले' असे म्हणून त्याच्याशी भांडते. देवाने संसार बुडविला म्हणून त्याच्यावर चिडते, तरी तिच्या साध्याभोळ्या करुण वाणीत आईची माया आहे, पुत्राविषयीची कळकळ आहे व विठ्ठलावरील विरोध-भावनेतून व्यक्त्त होणारे प्रेम आहे--
मी एक आहे तंव करीन तळमळ / मग तुझा सांभाळ कोण करी? //
जरी जालासि शहाणा तरी माझें लेंकरुं / माझा वेव्हारु विठ्ठलासी //
नामदेवांचा नित्यक्रम चालूनच होता. तो सुटावा म्हणून गोणाईप्रमाणेच दामाशेटी आणि राजाई यांनीही त्याची पाठ पुरविली. त्यांच्या वडिलांना हा नित्याचा विठ्ठलछंद पसंत नव्हता. ते नामदेवांना म्हणत--
``नामदेवा, शिवण्याटिपण्याचा व्यवसाय करून प्रपंच चालविणे हा आपला कुलधर्म. गणगोतात तू चांगलाच लौकिक कमावलास, अरे तुला ही कसली भूल पडली? विठ्ठलाच्या ठिकणी तुला एवढे कसले सुख लाभले? तुझा देव पाहावा तर धडफुडा आणि तूं त्याचा निधडा भक्त्त. खरोखरी एकमेकांना तुम्ही चांगले शोभता, तुझ्याविषयी केवढ्या आशा मी ऊराशी बाळगल्या होत्या ! माझे आयुष्य आता संपत आले आहे. थोडेच दिवस उरले आहेत. आमच्या पश्चात तू नावलौकिक राखशील असे वाटले होते, पण तू तर चांगले दैव काधलेस. खांद्यावर भोपाळा काय घेतोस? रामकृष्णाचा जप काय करतोस? अरे, नाम्या तू सर्व लोकलज्जा सोडलीस आणि कुळाला कलंक लावलास.''
दामाशेटीचे हे बोल कडक वाटतात. त्यांच्या वाणीत उपरोधाबरोबर निर्भर्त्सनाही आहे.
नामदेवांनी संसारात लक्ष घालावे म्हणून त्यांची पत्नी राजाई हिने त्यांचे मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला. तीही उद्वेगात म्हणे--
``तुमची आई तुम्हाला शिकविते ते तुम्ही ऐकत नाही. तुम्हाला लौकिकाची भीती व लाज वाटत नाही. लंगोटी लावून गोसावी झालात खरे, पण आमची उठाठेव कोण करणार? तुमची ही विरक्त्त स्थिती पाहून मला काळजी पदली आहे. बळेच आपण वेड कशाला लावून घेता? कंटकमय परिस्थिती झाली खरी. गोकुळासारखा संसार, तोही उजाड केलात व जगात नावलौकिक वाढविलात. मायामोहाच्या बेड्या तोडल्या पण ही मोहिनी तुमच्या मनाला कोणी हो घातली? सर्वस्वाचा त्याग केलात नि देव जोडला. त्यानेच माझ्या संसाराचा नाश केला. तुम्हाला माझी दया कायेत नाही? माझी सासू तर भोळीभाबडी. त्यांनी पांढय्रा स्फटिकासारख्या माझ्या पतिरायाला जन्म दिला. त्यांनी भगवंताला वश केले. आता मी काय करू?''
राजाईला शेवटी आपल्या पतीची आध्यात्मिक योग्यता व सामर्थ्य पटले. पश्चात्तापाने ती म्हणते--
मी तंव अज्ञान न कळे तुमचा महिमा / अपराध क्षमा करा माझा //
अंतरींची खूण कांहीं सांगा मज / जें तुम्ही बीज हदयी धरूनि असां //
जेणें सुखें तुमचें चित्त निरंतर / आनंदें निर्भर सदा असे //
नामदेवांच्या चरित्रात असे सरस व भक्त्तिरसाने भरलेले अनेक प्रसंग आहेत. आपली जीवनविषयक भूमिका नामदेवांनी आत्मचरित्रात विस्ताराने सांगितली आहे. त्यात पारमार्थिक साधने करीत असता काय काय अडचणी आल्या, कौटुंबिक अडथळे कसे सहन करावे लागले, इत्यादींचे सुंदर निरूपण नामदेव व त्यांची आई गोणाई यांचा संवाद, ते व त्यांचे वडील दामाशेटी, नामदेव व त्यांच्या पत्नी राजाई यांचा संवाद यात तटस्थ वृत्तीने केले आहे. आरंभी नामदेवांच्या विठ्ठलभक्त्तीला विरोध करणारे हे संपूर्ण कुटुंब त्यांच्या प्रभावाने विठ्ठलाच्या भक्त्तिप्रेमात पुढे रंगून गेले, विलीन झाले हे नामदेवांनी स्वीकारलेल्या भाक्त्तिमार्गाचे फार मोठे यश आहे. नामदेवांनी ही आत्मकथा अतिशय आत्मीयतेने आणि तळमळीच्या उत्कट भाषेत सांगितली आहे. प्रापंचिक साधकांना या आत्मकथेचा फार उपयोग होतो व नामदेवांच्या गृहजीवनाचीही त्यावरून चांगली ओळख होत.
नामदेव-ज्ञानेश्वर भेट व गुरूपदेश
नामदेवांच्या जीवनात अत्यंत मह्त्ताची घटना म्हणजे नामदेव व ज्ञानदेव यांच्या प्रथम भेटीचा प्रसंग. या भेटीच्या काळाचा अंदाज ज्ञानदेवांच्या परंपरेतील चवथे उद्‍अबोधनाथ यांनी लिहिलेल्या ज्ञानदेव चरित्रातील भिंत चालविल्याच्या प्रसंगाच्या कालनिर्देशावरून करता येतो --
भानू शत भानू रची ज्ञानेश्वरी / विकृत संवत्सरीं ज्ञानरूप //
त्याच शकीं रिपु म्हैसा बोलविला / चालवि भिंतीला वसू माजी //
यावरून शके १२१२ च्या कार्तिक महिन्यात निर्जीव भिंतीस चालवून तापीतीर निवासी सिद्ध चांगदेवास सामोरे जाण्याची आज्ञा ज्ञानदेवांनी त्या भिंतीस केली. त्यानंतर चांगा वटेश्वरांनी ज्ञानदेवांच्या प्रेरणेने मुक्त्ताईचा अनुग्रह घेतला. या अनुग्रहानंतर नामदेव-ज्ञानदेवांची भेट झाली, असे निवृत्तिनाथादी संत व मुक्त्ताबाई यांच्यात झालेल्या संवादावरून म्हणता येते. नामदेवांचा जन्म शके ११९२, म्हणजे या भेटीच्या वेळी त्यांचे वय २० वर्षाचे होते. हे भेट शके १२१२ च्या कर्तिक महिन्यानंतर आळंदी येथे झाली असावी.
लहान वयातच आवंढ्या नागनाथाच्या देवळात नामदेवांना `ससार' झाला होता. ``........प्रेमें केला वेडा पांडुरंग'' अशी त्यांची स्थिती होती. हळुवार मनाच्या त्या अवस्थेत पांडुरंगाची सगुण मूर्ती हेच परब्रह्म. त्याच्या व्यतिरिक्त्तदेव नाही, अशी सगुण मूर्तीच्या स्वरूपाचा ध्यास घेऊन तळमळत राहणाय्रा नामदेवांची ठाम समजूत होती. या एकविध अंधश्रद्धेला धक्का देण्याच्या उद्देशानेच, ``नामदेवा देवे सांगितलें कानीं / संतांचे दरुशनी जावे तुवां // '' अशी देवाकडून प्रेरणा मिळाली व ते निवृत्तिनाथादी भावंडांच्या दर्शनाला आळंदीस आले. ``पंढरीचा प्रेमा घरा आला''म्हणून निवृत्तिनाथ नामदेवांच्या चरणी लागले. आपणच विठ्ठलाचे गाधे भक्त्त असा अहंकार नामदेवांच्या चित्तात दडला होता. तो यावेळी बाहेर पडला. ते म्हणाले, `` आम्ही देवाच्या सान्निध्यात सतत आहोत. मग यांच्या चरणवंदनाची आम्हांस आवश्यकता काय?'' यानंतर ज्ञानदेवांनी त्यांना नमस्कार केला. यांच्यापेक्षा वयाने वडील असल्याने यांना आम्ही वंद्य '' , असे म्हणून नामदेव स्तब्ध राहिले. सोपानदेवांनी नामदेवांना प्रत्यक्ष पांडुरंगाच्या ठिकाणी मानून श्रद्धापूर्वक नमन केले. त्यांनाही नामदेवांनी प्रतिनमस्कार केला नाही. या गोष्टीतील मर्म मुक्त्ताबाईच्या मनोमन ध्यानात आले. ती मूळचीच सडेतोड. नामदेवांना वंदन करण्याचे तिने साफ नाकारले. उलट तिने प्रश्न केला--
अखंड जयाला देवाचा शेजार / काय अहंकार गेला नाहीं //
मान अभिमान वाढविसी हेवा / दिस असतां दिवा हातीं घेसी /
परब्रह्मासंगें नित्य तुझा खेळ / आंधळ्या डोहळे कां बा जाले //
कल्पतरु तळवटीं इच्छिल्या त्या गोष्टी / अद्यापि नरोटी राहिली कां //
पण निवृत्तिनाथांनी मुक्त्ताबाईला दटावले, `ऐसे न म्हणावे बाई' ; परंतु तिची कुजबूज चालूच होती. उसाच्या शेजारी एरंडाची झाडे लागली म्हणून का त्यांच्यात गोडी येणार ? विठ्ठलाच्या सहवासात असला म्हणून का नामदेवाचा कोरेपणा जाणार आहे.? चंदनाचे झाड खर, पण अहंकाररूपी सापाने ते वेधलेले आहे. भक्त्तीचा बोलबाला केला नि अहंकार खुंट वाढविला. गुरुशिवाय कोरडाच. या सज्जनांनी त्याला चांगदेवासारखे भाजून पक्के करावे. कुंभार आव्यात मडकी भाजतो, त्याप्रमाणे याला भाजून काढा आणि पावन करून आपले ब्रीद खरे करा. गोरोबा काकांना बोलवा. संतपणात हा पक्काझाला का कोरा आहे, यासंबंधी त्यांच्याकडून परीक्षा करून निर्णय घ्या नामदेवासारखा भक्त्तराज आपल्या संप्रदायात नाही म्हणून निवृत्तिनाथांचाही जीव कासावीस होत होता. ``ऐसे गुंफेमध्ये नाहीं नामदेव / म्हणूनी माझा जीव थोडा होतो //'' भक्त्तिसामर्थ्याने देवाला वश करणारा हा भक्त्त आपल्या संप्रदायात यावा हीच तळमळ निवृत्तिनाथांच्या शब्दांत व्यक्त्त झाली आहे.
यानंतर योगिती मुक्त्ताबाई योगसामर्थ्याने गोरोबाच्या भेटीस गेल्या. ही भेट कशी झाली याचे वर्णन ज्ञानदेवांनी नाथसांप्रदायाच्या सांकेतिक भाषेत केले आहे.
मुक्त्ताईने सोहंध्वनी करताच आकाशात मोत्याचा चुरा फेकावा आणि विजेचा प्रकाश दिसावा तसे झाले. जरतारी पीतांबरांनी आकाश झाकून टाकवे त्याप्रमाणे खालपासून वरपर्यत नीलबिंदु सागर, त्यावर नाचणारी सर्पाची पिले दिसू लागली. सर्वत्र शून्याकार झाले. कडाडून वीज चमकावी आणि आपल्याच ठिकाणी गुप्त व्हावी त्याप्रमाणे गोरोबास मुक्त्ताई भेटल्या.
या भेटीतून नामदेवांच्या भतीमधील अपुरेपणाचा निर्ण्य झाला आणि गुरूपदेशाचे महत्त्व प्रस्थापित झाले. गुरूपदेश घेतल्यानेच आपल्या ऊत्कट भक्त्तीला परिपूर्णता येईल असे यातून नामदेवांना समजून चुकले. विठ्ठलाच्या साक्षात्काराने त्यालाच अनुमती मिळाली.
गोपाळकाल्याच्या एक प्रसंगी निवृत्तिनाथ पंढरीस आले होते. तेव्हा नामदेव अंतर्मुख होऊन ईश्वरी प्रेमात तल्लीन झालेले त्यांनी पाहिले. निवृत्ती, ज्ञानदेव आणि सोपान यांना मिळालेल्या ब्रह्मबीजाची प्राप्ती खेचरनाथांकडून घेण्यास नामदेवांना विठ्ठलाने प्रेरणा दिली असे निवृत्तिनाथ म्हणतात--
नुघडितां दृष्टि नबोले तो वाचा / हरिरूपी साचा तल्लीनता //
उठि उठि ते नाम्या चाल रे सांगातें / माझे आवडते जिवलगे //
कुरवाळिला करें पुसतसे गुज / घेई ब्रह्मबीज सदोदित //
ज्ञानासि लाघले निवृत्ति भावले / सोपाना घडले दिनरात //
तें हें रे सखया खेचरासि पुसे / गुरुनामीं विश्वासें ब्रह्मरुपें //
निवृत्ति म्हणे आता अनाथा श्रीहरी / तूंचि चराचरी हेचि खूण //
या सुमारास नामदेवास असा ईश्वरी साक्षात्कार झाला की--
श्रीगुरुवांचूनी मुक्त्ती तुज नाहीं / भवनदीडोहीं नुतरसी //
सद्‍गुवांचूनिया कैसा मुत्क्तिठाव / संसार हा ठाव कैसा होय //
म्हणूनई नाम्या तुंवा गुरुसी जावे शरण / जेणे भवबंधन मुत्क्त होती //
याशिवाय साक्षात्कारात ``देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी / शरण तयासी जावें वेगीं //'' तेव्हा विसोबा खेचर ज्या गावी होते त्या आवंढ्या गावी नामदेव अनग्रह घेण्याकरिता गेले. तेथे मल्लिकार्जुनाच्या देवळात देवाच्या पिंडीवर पाय ठेवून विसोबा स्वस्थ झोपलेले त्यांनी पाहिले. असला लोकविलक्षण प्रकार पाहून नामदेव खुप संतापले आणि खेचरनाथांना म्हणाले-
उठी उठी प्राण्या आंघळा तूं काय / देवावरी पाय ठेवियले //
विसोबा खेचर जागे होऊन म्हणाले, ``नामदेवा, मी तुझ्यासारखा सर्वज्ञ आणि भक्त्त नाही. तुझा देव कसा आहे, हे माहीत नसल्यामुळेच माझ्या हातून असे घडले. आता कृपा करून थोडा विचार कर आणि जेथे देव नसेल, तेथे माझे पाय उचलून ठेव''.
विसोबाच्या या वाक्यात काहीतरी खोल व गूढ अर्थ भरला आहे असे वाटून काही वेळ विचार केल्यानंतर नामदेव आपल्या मनाशीच म्हणतात-
देवावीण ठाव हे बोलणेची वाव //
अशी वस्तुस्थिती असता परमेश्वराच्या सर्वव्यापी स्वरूपाच्या अज्ञानामुळेच आपण सद्‍गुवर रोगावलो.
त्यांना आपल्या अहंकाराचा पश्चात्ताप झाला आणि त्यांनीखेचराचे पाय धरले.
तिहीं त्रिभुवनीं आपण व्यापुनी / आनंदें कोंदोनि राहियेला //
श्रीगुरुचे पाय जीवें न विसंबत / मनोवृत्तिसहित ओवाळिलें //
डोळियांचे डोळे उघडिले जेणें / आनंदाचे लेणें लेवविलें //
जन्ममरणाचें तोडिलें साकडें / कैवल्यचि पुढें दावियेलें //
कैवल्याचा गाभा विटेवरी उभा / दिसे दिव्य शोभा पांडुरंग //
नामा म्हणे माझी भत्त्कि हे माऊली / कृपेची साउली केली मज //
पश्चात्तापाने झालेली नामदेवांची चित्तशुद्धी पाहून विसोबा खेचर म्हणाले, ``रूप नाही असा हा परमात्मा पिंड, ब्रह्मांड, जल, स्थल, काष्ठ, पाषाण, अणुरेणू व्यापून साक्षीभूत आहे हे तू जाणून घे. तो जेव्हा नाही असा काळ नाही आणि तो जेथे नाही असे स्थळही नाही, अशी भावना रात्रंदिवस दृढ करून ठेव. शेवटी माझे असे सांगणे आहे की--
सुखाचें स्वरुप घेऊन जा तरी / विठ्ठल नामें भरी तिन्ही लोक //
खेचर विसा म्हणे येथूनी काढिलें / तें तुज दिघलें जारे नाम्या //
खेचरनाथांनी ह्रदयातून कढून दिलेला हा ज्ञानोपदेश नामदेवांनी लक्षपूर्वक ऐकला. नंतर सद्‍गुरुंनी नामदेवांना निर्गुणानुभूती दिली--
श्रवणीं सांगितली मात / मस्तकीं ठेवियेला हात //
पदपिंड विवर्जित / केला नामा //
खेचरु विसा / प्रेमाचा पिसा //
तेणें नामा कैसा / उपदेशिला //
सांगितले गुज / दाखविले निज //
आतां पाल्हाळीं तुज / काय चाड //
खेचरु म्हणे मज ज्ञान हेंचि गुरु /
तेणें अगोचरु केला नामा //
याचवेळी पाषाण मूर्ती म्हणजे देव नव्हे हेही गुरूंनी सांगितले.
पाषाणाचा देव बोलेचिना कधीं / हरि भवव्याधि कैसे घडे //
दगडाची मुर्ति मानिला ईश्वर / परि तो साचार देव भिन्न //
पाषाण देवाची करिती जे भक्ति / सर्वस्वा मुकती मूढपणें //
प्रस्तराचा देव बोलत भक्तातें / सांगते ऐकते मूर्ख दोघे //
द्वादशीचे गांवीं जाहला उपदेश / देवाविण ओस स्थळ नाहीं //
तो देव नामया ह्र्दयीं दाविला / खेचरानें केला उपकारु हा //
आध्यात्मिक जीवनात गुरुकृपा हा महत्त्वाचा टप्पा गाठल्यानंतर जे अनुभव आले ते `` सद्‍गुरु नायकें / पूर्ण कृपा केली // '' या अभंगात नामदेवांनी नमूद केले आहेत. या आत्मबोधानंतर सर्वाभूमी साक्षात्कार होताच नामदेवांचा भ्रमनिरास झाला आणि विठ्ठलाच्या मूर्तीपेक्षा `विठ्ठल' नावाचीच महती त्यांना अधिक वाटू लागली. विठ्ठलाची भक्त्ती म्हणजे विठठलाच्या ठिकाणी असलेली समता, समद्शिता, प्रसन्नता, बंधुता, इत्यादी सात्त्विक गुण किंवा दैवी संपदा अंगी मुरविणे होय हे त्यांच्या ध्यानी आले, आणि-
नाचूं कीर्तनाचे रंगीं / ज्ञानदीप लावूं जगीं //
अशा निश्चयाने गुरुमहाराजांना शेवटचा प्रणाम करून ते पंढरपुराला जावयास निघाले.
पंढरपुरातील नामदेवांचा भक्त्तिरंग या विलक्षण अनुभवानंतर अधिकच वेगळ्या रूपात उजळून निघाला. त्याच्या जीवनातला यानंतरचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हण्जे ज्ञानदेवांच्या समवेत त्यांनी केलेली तीर्थयात्रा हा होय.
अलौकिक यात्रिक
शके १२१२ मध्य ज्ञानेश्वरी लिहून भगवद्‍अगीतेचा अर्थ विशद केल्यानंतर ज्ञानोबा माऊली आपल्या निवृत्तीनाथादी भावंडांसह पंढरपुरास श्रीपांडुरंगरायाच्या दर्शनास आली. यापूर्वीच या लोकोत्तर भावंडांनी उदंड कीर्ती मिळविली होती. त्यांचा कीतिसुगंध महाराष्ट्रभर पसरला होता. ज्ञानदेव आले ते विठ्ठलदर्शनानंतर परम भक्त्तिशिरोमणी नामदेवांच्या भेटीस गेले. नामदेवांनी ज्ञानदेवांच्या पायावर लोटांगण घातले. त्यास प्रमपुरःसर आलिंगन दिले. त्यांनी,``नामदेव म्हणे सुफळ माझे जिणें / स्वामींच्या दर्शनें ध्यन झालों //'' अशा शब्दांत ज्ञानदेवांचे गौरवपूर्ण स्वागत केले. यावर, ``ज्ञानदेव म्हणे तूं भक्त्तशिरोमणी / जोडिले जन्मोनी केशव चरण // प्रेमसुख गोडी तुजचि फावली / वासना मावळ्ली सकळ तुझी // '' असे म्हणून नामदेवरायांच्या भक्त्तिसुखाला हार्दिक धन्यवाद दिले. नंतर ज्ञानदेवांनी आपला तीर्थयात्रेचा मनोदय व्यक्त्त केला. मग हे उभय संत `एकंती बैसोनी सहज' अंतरीचे गुज बोलू लागले. ज्ञानदेव म्हणाले, जीवनमुक्त्त ज्ञानी जरी झाले पावन / तरी देवतीर्थ भजन न सांडिती // म्हणून ``देशातील पवित्र तीर्थें प्रत्यक्ष डोळयांनी पाहावी, तुझ्या समागमसुखाचा लाभ घ्यावा आणि जीवन-सार्थक करावे, अशी उत्कंठा लागल्यामुळे मी तुला तीर्थयात्रेला नेण्याकरिता मुद्दाम आलो आहे. तरी माझे हे मनोरथ पूर्ण कर.''
नामदेवराय विठ्ठलाचे अनन्य भक्त्त. त्यांचे मन पंधरी क्षेत्र व पांडुरंग यांना सोडून तीर्थयात्रेस जाण्यास तयार होईना. पांडुरंगाचे पाय मनात अठवून नम्रपणे ते जॅअनदेवास म्हणाले, ``माझे सारे सुख या पांडुरंगाच्या पायाशी आहे. मग अन्य तीर्थयात्रा करावयास जाण्याची गरजच काय ? म्ला पुरुषार्थ नकोत. चारी मुक्त्तीही नकोत. मी पंढरीचा भिकरी होऊन पांडुरंगाच्या महद्वारात पडून राहीन''. शेवटी नामदेवांनी पांडुरंगाच्या अनुज्ञेचा हवाला दिला. त्यावर, ``जावें स्वस्तिक्षेम यावें शीघ्रवत / करावे स्वहित कळेल तैसें // '' ही श्रीपांडुरंगरायाची आज्ञा शिरसावद्य मानून नामदेव मोठ्या नाईलाजाने ज्ञाअनदेवांबरोबर तीर्थयात्रेला निघाले.
नामदेव-ज्ञानदेवांचे तीर्थाटन म्हणजे भक्तिज्ञानाचा प्रीतिसंगमच म्हटले पाहिजे. ज्ञान-नामाची ही दुक्कल प्रसन्न अंत:करणाने मार्ग आक्रमण करीत होती. तीर्थावळीच्या अभंगात ``ऎसे सुखरूप दोघे चालताती मार्गीं'' या प्रारंभीच्या उल्लेखावरून पहावयास मिळते व विसोबा खेचरादी संत तीर्थयात्रेत मागाहून सामील झाले असावेत असे देसते.
लहान मूल आपल्या आईची पुन:पुन: आठवण काढते, त्याचप्रमाणे नामदेवांना विठ्ठलची आठवण यात्रामार्गात वारंवार होऊन पांडुरंगाचा विरह त्यांना सहन होईना. कंठ दाटून येई. ते पुनःपुनः पंढरीच्या दिशेने मागे वळून पहात. विरहव्यथा असह्य होऊन ते म्हणाले, ``हे केशीराजा, माझे ह्र्दय तुझ्या वरहाने फुटू पहात आहे. तूच माझी आई. तूच माझा प्रियसखा. तूच माझे तीर्थव्रत, धर्म, काम, सर्व काही तुच आहेस. तूच माझे सर्वस्व, तुझा वियोग मला कसा सहन व्हावा? देवा आता--`येऊनी ह्र्दय कमळीं राहे माझ्या'--इतकेच माझे मागणे आहे.''
नामदेवांची ही करुण अवस्था पाऊन त्यास धीर देण्यासाठी ज्ञानदेव म्हणाले, ``हे विष्णुदासा, भगवत्‌ प्रेमाचा जिव्हाळा तुझ्या अंतःकरणात भरपूर आहे. मग उगाच खंत का करतोस? हे भक्त्तराया, तुझ्या ह्र्दयातच स्वानंद स्वरुप परमात्मा साठविलेला आहे. '' नामदेवांच्या एकविध निष्ठावंत प्रकृतीला हे पटले नाही. म्हणून पांडुरंगाची अंतरीची तळमळ व्यक्त्त करीत ते म्हणाले, ``ज्ञानदेवा, मी ज्ञानी नाही किवा योगीही नाही.एका पंढरीनाथाशिवाय मला दुसरे विश्रांतिस्थान नाही. माझा सर्व भाव त्याच्याच ठायी आहे. जी सुंदर मूर्ती भक्त्तराज पुंडलिकासमोर उभी आहे, तेचसुंदर रूप, तीच विटेवरील मूर्ती मला प्रिय आहे. तीच भक्त्तवत्सल विठ्ठलमूर्ती मी डोळे भरून पाहीन. मला आणखी दुसय्रा कशाचीही गरज नाही. तीच मला दाखवा'' ज्ञानदेव म्हणाले, ``नामदेवा, तू ही द्वैत भावना सोदून ते सर्वव्यापी स्वानंदस्वरूप मनात आठव. तुझा पांडूरंग एकदेशी नसून सर्व देशाअवकाश भरून राहिला आहे. तो देशकाल परिच्छेदशून्य आहे. तो सर्वत्र संपूर्णत्वाने आहे. तो जेथे नाही असे स्थळ मिळावयाचे नाही. आकाश जसे सर्वव्यापी तसेच तो परमात्मा सर्वविश्व व्यापून आहे. मग तू अकारण कष्टी का होतोस?'' सगुणोपासक नामदेवांना या ज्ञानापासून समाधान मिळाले नाही. त्यांनी ज्ञानदेवांना स्पष्ट सांगून टाकले की, `` मला त्या विठ्ठलमुर्तीचा ध्यास लागला आहे. त्याचे गुणानुवाद गाताना, ऐकताना आणि ती मूर्ती प्रत्यक्ष डोळ्यांनी पहाताना मला परमानंद होतो.त्या विठ्ठलाच्या सतत सान्निध्याचा मला लाभ पाहिजे.'' हे ऐकून ज्ञानदेव म्हणाले, ``सर्वव्यापी, अव्यक्त्त, अक्षर, अविनाशी परमात्म स्वरूप म्हणजे मीच, या भावनेने ज्ञानी पुरुष त्याची उपासना करतात. ते अशा उपासनेत सर्व इंद्रियांचा संयम करून अद्वैतभावाने नित्य स्वानंदसुखाचा अनुभव घेतात''. यावर नामदेव म्हणाले, ``तोच सुखोपभोग मला माझ्या विठ्ठलाच्या चरणी घेता येतो. तेव्हा मला इतरांच्या मार्गाने जाण्याचे कारण नाही'' ज्ञानदेवम्हणाले, `` आम्हीही ते विठ्ठल स्वरूपच परमात्मा समजतो. ते सर्वगत आहे. सर्वव्यापी आहे. ते सर्वत्र सर्वकाळी आहे. त्या स्वरूपाला होणे आणि जाणे नाही. ते तुझ्यात आहे व तू त्याच्यात आहेस. अशा निर्धारने त्याच्या ठिकाणी मन ठेवून अनुभव घे.'' नतंर नामदेव म्हणाले, ``आपले हे म्हणणे खोटे नाही, परंतु पृथ्वीवर सर्वत्र पाणीच पाणी असूनही, चातक पक्षी तिकडे ढुंकूनही पहात नाही. तो मेघाकदेच टक लावून आपली चोच वासून, मेघातून पड्णाय्रा पाण्याच्या थेंबाचीच वाट पहातो. त्याप्रमाणे माझे मन अहोरात्र विठ्ठलाचेच चिंंतन करते. तोच माझा जीवनमेघ आहे''.नामदेवांचे हे बोलणे ऐकून ज्ञानदेव म्हणाले, ``नामदेवा, पांडुरंगाच्या ठिकाणी असलेला हा तुझा एकविध भाव पाहून, तू धन्य आहेस, असे म्हणावे लागले.' हे ऐकून नामदेव म्हणाले, ``ज्ञानदेवा, विठ्ठलच माझे सुख आहे, माझे विश्रांतिस्थान आहे. माझे निस्सीम प्रेम त्याच्याच ठायी आहे'' अशा प्रकारे सुखसंवाद करीत ते दोघे संत चालले असतानाच्या आणखी अशाच एका बहारीच्या प्रसंगाचे वर्ण्न नामदेवांनी तीर्थावळीत केले आहे.
स्वानंदपूर्ण अंतःकरणाने वाटचाल करीत असता त्या दोघांच्याही ह्र्दयात भक्त्तिप्रेम ओसंडून चालले होते. दोघेही स्वहिताच्या गोष्टी करीत. अनुभवाची कसोटी दाखवीत होते. स्वानंदसुखाचा तर सारखा वर्षाव होतहोता. पुढे ज्ञानदेवांनी नामदेवांना प्रश्न विचारला, `` हे नामदेवा, हे अविनाशी भक्त्तिभाग्य, तू कसे जोडलेस? तुझा तो भक्त्तिमार्ग मला सांग. तुझा तो भजनविधी सर्वांगांनी कसा साधावा? सत्त्वशील, सत्त्वगुणयुक्त्त नमनाचा प्रकार मला सांग. निर्विकार ध्यानाचा प्रकार मला समजावून सांग. श्रवण, मनन आणि निजध्यास कशास म्हणावे ? भक्त्ती, धृती आणि विश्रांती कशाला म्हणावे? हे मला स्पष्ट करून सांग. या भक्त्तिसुखाची मला फार उत्कंठा लागली आहे--
बहु उत्कंठित या सुखाकारणें / तें मज पारणें करवी आतां //
ज्ञानदेव थोर व ज्ञानी. त्यांचा हा प्रश्न ऐकून नामदेवराय साहजिकच सद्‍गदित झाले. पांडुरंगकृपेचे मा केवळ पोसणे आहे. मी बहुश्रुत नाही. ज्ञानशील नाही.वैष्नवांचा मी एक दुबळा दास आहे, इत्यादी बोलून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न नामदेवांनी केला. यावर ``दृष्टी दुजेपणी न ठेवावी, पंढरीरायाचा तू प्रेम भांडारी, आशा पुर्ण करी मज याचकाची,'' असे ज्ञानदेव आग्रहपूर्वक म्हणाले. शेवटी नामदेवांनी, ``ऐसी ऐकुनिया उत्तरें प्रेमा आला पोटीं'' या अभंगात व्यक्त्त केलेला पुढील स्वानुभव थोडक्यात निवेदन केला--
``मीतूपणा मावळून सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी दया-करुणा वाटू लागणे, याला भजन म्हणणे मला इष्ट वाटते. या भजनाशिवाय इतर साधाने व्यर्थ व कष्टप्रद होत. अंतःकरणात आनंदाचा प्रकाश धारण करून म्हणजे मन निर्मळ करून, प्रसन्न ठेवून, कोणाचेही गुणदोष न पहाता, सर्वांशी नम्रतेने व्यवहार करणे हे नमन होय. याहून इतर प्रकारची नम्रता दांभिक समजावी. ज्यामध्ये सर्व विश्वात एकमात्र विठ्ठल प्रतीत होतो आणि ज्या ध्यानात त्याचेच अखंड स्मरण होत राहाते, तेच निर्विकार ध्यान होय. हरिणी गायननादाला लुब्ध होऊन अत्यंत आसक्त्तीने देहभान विसरते त्याप्रमाणे भगवंताच्या स्मरणात मन तल्लीन होऊन त्यातच मन दृढ केले जाते. तेच खरे प्रेमयुक्त्त श्रवण होय. स्वहिताचा सातत्याने अखंड विचार करणे हेच सात्त्विक मनन होय. कोषकीटक भिंगुरटीचेच चिंतन करता कीटक, भिंगुरटीच होऊन जातो, त्याप्रमाणे भगवंताच्या चरणाचे दृढ अनुसंधान राखून भगवत्‌स्वरूप होणे हे निजध्यासन होय. सर्वभावे एका विठ्ठलचेच ध्यान, सर्वभूतांच्या ठिकाणी त्याच्याच स्वरूपाचे दर्शन, रजतम रहित तिन्ही गुणांच्या बंधनातून मुक्त्त होऊन केवळ ईश्वरप्रेमाचाच आनंद भोगणे याचे नाव भक्त्ती. स्थिरबुद्धी होऊन, अनासक्त्तपणे वैराग्ययुक्त्त अंतःकरणाने भगवत्‌प्रेमात तल्लीन होऊन देहभान हरपणे व प्रारब्धभोग तक्रार न करता भोगणे यालाच मी धृती मानतो. एकांतावस्थेतील ध्यान हीच खरी विश्रांती होय. याहून दुसरे विश्रांतीचे लक्षण नाही ज्ञानदेवा, माझ्या भगवत्‌प्रेमाचा हा कायिक, वाचिक आनि मानसिक असा त्रिविध अनुभव त्या परम, उदार आणि सर्वज्ञ पांडुरंगाने माझ्याकडून वदविला आहे''.
भजनप्रेमापासून विश्रांतीपर्यत भक्त्तिरहस्य प्रगट करणारी नामदेवांची ही दिव्य वाणी ऐकल्यानंतर ज्ञानदेवांचेही ह्र्दय हेलावू लागले. ते म्हणाले--
``भक्त्त-भागवत पुष्कळ ऐकले, पूर्वी असंख्य झाले, पुढेही होतील, पण नामदेवांची सर इतरांना येणार नाही. नामदेवांचे बोलणे केवळ कवित्व नाही, त्यात काही निराळाच निरुपम रस भरलेला आहे. त्या बोलण्यात जी सुखविश्रांती लाभते. ती अन्यत्र कल्पान्ती लाभणार नाही. संतांनी विचार करून पहावा.
भक्त भागवत बहुसाल ऐकिले / बहु होऊनी गेले होती पुढे //
परी नामयाचें बोलणें नव्हे हें कवित्व / हा रस अद्‍भुत निरुपमु //
हे सुखविश्रांति नाही हो कल्पांतीं / विचारावे संती दूरदृष्टी //
पंढरपुराहून कह्राड-तह्रेगावच्या मार्गाने हा वैष्णवमेळा चालला होता. वाटते जडमूढांचा उद्धार करीत त्यांना आपल्या समागमाचा लाभ देत, दर्शनोत्सुक डोळ्यांचे पारणे फेडीत हा वैष्णवमेळा तापी नर्मदातीरी आला. तेथून त्यांनी पश्चिम प्रभास, पट्टण, सोमनाथतीर्थ, द्वारका, मथुरा, गया, वाराणसी, कुरुक्षेत्रादी तीर्थांच्या यात्रा करून जजस्थानात असलेल्या बिकानेरनजीक ते आले. तेथून सुमारे ५० मैलांच्या अंतरावर असलेल्या वालुकामय प्रदेशात वाटचाल करीत असता नामदेव व ज्ञानदेव हे दोघेही तृषेने व्याकुळ झाले. पाण्याच्या शोधात असता अतिशय खोल अशी एक बिहीर त्यांना दिसली. तेव्हा ज्ञानदेवांनी लघिमासिद्धीचा अवलंब करून सूक्ष्म देह धारण केला. ते विहिरीत उतरले आणि त्यांनी आपली तृषा शांत केली. नामदेवासाठी योगसिद्धीने पाणी आणून देण्याची त्यांनी तयारी दाखविली, परंतु--
नामा म्हणे धीर धरावा नावेक / दाखवीन कौतुक स्वामी जवळी //
इतके बोलून नामदेवांनी नेत्र झाकले आणि मनात विठ्ठलाचे स्मरण करून त्याचा धावा सुरू केला. त्याबरोबर ती विहीर पाण्याने उचंबळून एखाद्या वाहात्या झऱ्याप्रमाणे वाहू लागली--
तंव गडगडीत कूप उदकें वोसंडला / कल्पांती खवळला सिंधु जैसा //
नामदेवांच्या भक्त्तीचा हा प्रभाव पाहून ज्ञानियांच्या राजाने `` तीर्थयात्रेसि जाणे काही नलगे करणे '' असे धन्योद्‍गार काढले व `` समाधि सोहळा लयलक्ष वैराग्य / ते बा आम्हा जागीं आणियेले //'' असे कबूल केले. या प्रवासात अनुभवलेली भक्त्ती आणि योग यात फरक दर्शविणारी ही एक उद्‍बोधक कथा आहे. या घटनेवरून ज्ञान व योग मार्गाहून भजनमार्ग श्रेष्ठ होय हे सिद्ध होते. विद्वानांच्या मते योगमार्ग व ज्ञानमार्ग कष्टसाध्य आहे. म्हणून या दोन मार्गांत भक्त्तिमार्ग काठोकाठ भरलेल्या विहिरीसारखा सर्वांना सोपा आहे, असे या प्रकाराने सिद्ध होते.
त्या विहिरीस `नामदेव कुवा' असे म्हणतात. त्या निर्जल प्रदेशात तेव्हापासून ती विहीर प्रख्यात तीर्थस्थान बनली आहे.
कोलादजीहून ही वैष्णवमंडळी शके १२१७ म्हणजे इ.स.१२९५ मध्ये स्वदेशी--महाराष्ट्रत--परत आली व शके १२१८ च्या आषाढी एकादशीस पंढरपुरास येऊन दाखल झाली. आपल्या आईपासून प्रदीर्घ काल दूर असलेले मूल आपली आई भेटताच तिला धावून विळखा घालते, त्याप्रमाणे धावून नामदेवरायांनी पंढरीनाथाला मिठी घातली. त्यांचा कंठ दाटून आला. दोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. विठ्ठलाच्या चरणावर त्यांनी पुनःपुनः लोळण घेतली. ते म्हणाले, ``देवा, मी तीर्थांची उदंड प्रौढी ऐकली. त्या तीर्थक्षेत्रात प्रत्यक्ष नहात असताही मला तुझ्या चंद्रभागेची मात्र सारखी ओढ लागून राहिली हिती.''
या तीर्थाटनात गोरा कुंभार, परिसा भागवत, विसोबा खेचर, सावता माळी, आदी अनेक संत या वैष्णवांना पुढे येऊन मिळाले, असे तीर्थावळीतील अनेक उल्लेखांवरून दिसून येते. पंजाबातून परत येताना नामदेवांच्या दैवी सामर्थ्यावर लुब्ध झालेला जाल्हण उर्फ जाल्लो सुतार नामक त्यांचा एकनिष्ठ शिष्य भट्टिवाल या वैष्णव मेळ्याबरोबर आपल्या गावाहून पंढरीस आला होता. पंढरीत तीर्थयात्रेनिमित्त मावंद्याचा सोहळा मोठ्ठया समारंभाने झाला. त्यावेळी ``अवघे संतजन आमुचे सांगातीं / जेवूं एका पंक्त्ती सरिसें आम्ही //'' असा संकल्प श्रीपांडुरंगाने मनाशी करून--
निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान सांवता / जनमित्र पढियंता जीवलगू //
आसंद सुदामा विसोबा खेचर / नरहरी सोनार आदिकरुनि //
बाप आर्तबंधु कृपाळू दीनाचा / अभिमान भक्तांचा न संडी कदा //
चोखामेळा बंका भक्तवत्सल लाडका / तो बोलविला देखा आरोगणें //
वैराग्याचा मेरु तोअ गोरा कुंभारु / आवडता डिंगरु केशवाचा //
ऐसें थोरसानें सकळ भक्त राणे / देवें आरोगणें बोलावले //
ज्ञातिहीन मानलेले चोखोबा, बंका, या दीनांनाही या उद्यापनात त्यांच्या जातीमुळे दूर बसविण्यात आले नव्हते. वरील सर्व भक्त्तमंडळी सभोवार घेऊन मावंद्याची पूर्ती श्रीपांडुरंगानी केली. उच्च-नीच भावाचे अस्तित्व नाहीसे झाले होते. हे सहभोजन काल्पनिक नव्हते. ते खरोखरीच झाले होते. निवृत्तिनाथांच्या अभंगातही याला स्वतंत्र पुरावा मिळतो. शुद्ध भक्त्तीपुढे केवळ कर्मठपणा कसा पंगू आहे, तो कसा निरुपयोगी आहे, ही बाब या संतांनी पंढरपुरातील ब्रह्मवृंदांच्या निदर्शनास मावंद्याच्या निमित्ताने आणून दिली.
या उद्यापनपूर्व मिरवणुकीत चोखामेळा व बंकोबा यांनी संतमेळयापुढे काठीकर म्हणून वाटाड्याचे काम केले.
अशा प्रकारे चंद्रभागेच्या परम पवित्र तीरावर हे सर्व महाराष्ट्रीय संत एकत्र येण्याचा तो अखेरचा सुखावह प्रीतिसंगम होता.
या उद्यापनाच्या उत्सवानंतर सव्वा वर्षाच्या आतच ज्ञानदेवादी भावंडांनी व चांगदेवांनी समाधी घेतली. ज्ञानदेव शके १२१८ मध्ये कार्तिक वद्य १३ स आळंदी येथे, सोपानदेव शके १२१८ मार्गशीर्ष वद्य १३ स सासवड येथे, मुक्त्ताबाई शके १२१९ ज्येष्ठ वद्य १२ स एदलाबाद येथे, निवृत्तिनाथ शके १२१९ ज्येष्ठ वद्य १२ स त्र्यंबकेश्वर येथे व चांगदेव शके १२२० माघ वद्य ११ स पुणतांबे येथे समाधिस्थ झाले. या समाधिप्रसंगी नामदेवांनी जी प्रकरणे लिहिली ती अगदी साध्यासुध्या, ह्रदयाला पीळ पाडणाय्रा अभंगपंक्त्तीत आर्त वाणीने नामदेव म्हणतात--
गेले दिगंबर ईश्वर विभूति / राहिल्या त्या कीर्ति जगामाजीं //
वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानीं / आतां ऐसे कोणी होणें नाहीं //
सांगतील ज्ञान म्हणतील खूण / नयेचि साधन निवृत्तीचें //
परब्रह्य डोळा दाऊं ऐसे म्हणती / कोणा नये युक्ति ज्ञानोबाची //
करीतील अर्थ सांगतील परमार्थ / नये पां एकांत सोपानाचा //
चांगदेव योगी निष्काम चांगला / स्वरूपी रंगला केशवाच्या //
नामा म्हणे देवा सांगूं नये कांही / नये मुक्ताबाई गुह्य तुझें //
भारतयात्रा
`ज्ञानदीप लावूं जगीं' या काव्यपंक्त्तीत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे ईश्वरभक्त्तीच्या ज्ञानज्योतीवर असंख्य दीप उजळून मानवी उज्वल करण्याचे त्यांचे जीवनध्येय होते. ज्या शब्दांनी जनताजनादर्न डोलू लागेल, सर्वत्र प्रेमभाव वाढेल आणि आत्माज्ञानाचा दीप प्रज्वलित होईन असे साहित्य निर्माण करू अशी प्रेरणा, `बोलूं ऐसे बोल' या अभंगचरणात त्यांनी व्यक्त्त केली आहे. जनतेचा आध्यात्मिकदृष्ट्या विकास व्हावा हेच त्यांचे ध्येय होते, त्यामुळे ते स्वतःव त्यांची भाषा प्रांतिक मर्यादेत अलिप्तपणे गुरफटलेली नाही. भक्त्तिप्रचारासाठी त्यांनी त्या काळातील लोक-सरस्वतीत, म्हणजे हिंदी भाषेत रचना केली आणि आयुष्यभर भारतयात्रा चालू ठेवली. ते इतर प्रांतीय भाषा शिकले. महाराष्ट्रातून निघाल्यावर ते थेट दक्षिणेस म्हैसूर (कर्नाटकासह), तामिळनाड, रामेश्वरपर्यत गेले व उत्तरेकडे गुजरात, सौराष्ट्र, सिंधुप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब हरियाना, हिमाचल प्रदेश व पुन: पंजाबात भक्त्तिप्रचार करीत गेले. पंजाबी भाषेत त्यांनी पद्ये लिहिली. प्रांताप्रांतातील भाषा आत्मसात केल्या आणि त्यांचा उपयोग लोकजागृतीसाठी केला. त्या प्रचारकार्यात त्यांनी तथाकथित कनिष्ठ जातींना चांगल्या संस्कारांनी वर उचलून धरले व तथाकथित श्रेष्ठ मानल्या जाणाय्रा जातींना इतरांच्या चालीने चालविण्यास शिकविले. देवभक्त्तीची एकच धुमाळी देशभर उडवून दिली आणि भक्त्तिभावाचे वातावरण उभ्या देशात त्यांनी संचारत ठेवले.
नामदेवांना ज्ञानेश्वरांनंतर चौपन्न वर्षांच्या आयुष्य लाभले. या चौपन्न वर्षाच्या दीर्घ कालात त्यांनी कन्याकुमारीपासून हिमालयापर्यत अनेक पदयात्रा केल्या. त्या काळच्या असहाय, भयाण, अंधकारमय परिस्थितीत चाचपडणाऱ्या जनतेला अभय देणारा हा महापुरुष भीवरेच्या तटावरून उत्तरेस गेला. त्याने समाज संघटित व जागृत केला आणि भक्त्तिमार्गाचा झेंडा व समाज भावनेची स्फूर्ती पुढे नेली.
मागे सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वरादी संतांबरोबर नामदेवांनी उत्तरेकडील पहिली तीर्थयात्रा शके १२१३ ते १२१८ च्या दरम्यान केली.
दुसरी पदयात्रा त्यांनी दक्षिण भारतात केल्याची माहिती नवीन मिळालेल्या तीर्थावळीतील तीर्थयात्रेतील गावांच्या नावांवरून मिळते. श्रीशैलशिखर, मल्लिकार्जुन, अरुणाचल, चिदंबर, विष्णुकांची, रामेश्वर, ताम्रपणिका, आळुवा, कन्याकुमारी, हरिहरेश्वर जनार्दन या तीर्थांच्या ठिकाणी शके १२१८ च्या सुमारास जाऊन नामदेवांनी भागवतधर्माचा, मानवधर्माचा प्रचार केला. त्यामुळे दक्षिण भारतातील राज्यांतून विखुरलेल्या दर्जी, छिप्पिगा या अल्पसंख्य लोकांवर त्याचा प्रभाव पडला. तेव्हापासून ती अल्पसंख्य ज्ञाती आपणांस `नामदेव' म्हणवू लागली व मद्रास (तामिळ्नाडू) राज्यातील भूसागर व मल्ला या ज्ञाती ` नामदेव ' हेही आपल्या ज्ञातीचे समानार्थक नाव मानू लागले.
यानंतर संपुर्ण भारतवर्षाची प्रदीर्घ यात्रा नामदेवांनी पायी केल्याची माहिती नवीन उपलब्ध झालेली आहे. ही यात्रा शके १२२० ते १२२६ यासहा वर्षांतील दिसते. वै. प्र. सी. सुबंध यांना पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात, शके १५०३ मध्ये लिहिलेले एक जुने हस्तलिखित मिळाले. हे तीर्थयात्रेचे टांचण चौदा अभंगांत आहे. त्यात नामदेवांनी सर्व भारताची जी पदयात्रा केली त्याचे वर्ण्न संक्षेपाने केलेले आहे. ही तीर्थयात्रा नामदेवांनी एकाच वेळी व एकटयानेच केली असल्याचेही दिसून येते. कारण इतर संत त्यांच्याबरोबर असल्याचा कोठेही उल्लेख नाही. या प्रदीर्घ यात्रेत नामदेव काही तीर्थक्षेत्रांत अनेक महिने रहात असत. ``षण्मास राहिल्या द्वारकेचे पुण्य / एके दिवशी संकोद्वारी तेथे जाऊनि पाहिला देव //'' या अभंगचरणावरून द्वारकेला नामदेवांचा मुक्काम सहा महिने होता व या मुक्कामात ते संकोद्वाराला गेले होते हे कळते. या पदयात्रेची सुरुवात पश्चिमेकडून झाली. नंतर पश्चिमेकडून उत्तरेकडे व उत्तरेकडे पूर्वेकडील तीर्थक्षेत्रे पहात पहात पुन्हा ते पंढरपुरास आले. ती पदयात्रा पुढील क्रमाने पूर्ण झाली. या तीर्थक्षेत्रांची नावे-नीरा -भीवर संगम , गोदावरी नाशिक-पंचवटी, घृष्णेश्वर, ओंकारमांधाता, द्वारका, रैवतक, ढवळपूर, मुचकुंदगुंफा, प्रभास, सोरटीसोमनाथ, सिद्धपूर, पुष्कर, कुरुक्षेत्र, ठाणेश्वर, यमुनातीर, इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर अंतर्वेदी, मायापूर, हरिद्वार, ह्रषीकेश, देवप्रयाग, केदार, कैलास, बद्रिनारायण, मानससरोवर, गंडकी, अयोध्या, नैमिष्यारण्य, मधुपुरी, गोकुळवृंदावन, कालियाडोह, गौतमेश्वर, मिथिला (जनकनगरी), उज्जयिनी, प्रयाग, काशी, विश्वेश्वर, गया, गंगा-सागर संगम, महाबळेश्वर व पुन्हा परत पंढरपूर अशी ही सहा वर्षांची पदयात्रा होय. नामदेवांनी या तीर्थयात्रेतील पुढील अनुभव सांगितले आहेत-
गंगेचा ओघ पहावया जातां / कष्टलों बहुत शरीरें /
अवघड मार्ग न दिसे पुढे / मग तारिलें विठ्ठले //
तेथून जातां उत्तरपंथे / खुंटली शरीराची आंस /
हिमाचा पर्व्त उल्लंघितां / बहु झालों कासावीस /
वज्रकीटाचे लागले पाणी / जीवें झालों कासावीस /
हिंवाच्या लहरी आंगी चढोनि / चढले श्वास उच्छवास /
श्रीहर्र्र्च्या कृपें तरलों //११//
पुलिंद, पुल्कस, यवन, खस हे मद्यमांस भक्षक राक्षस त्रास देतात म्हणून मानस सरोवरापलिकडच्या भागात नामदेव गेले नाहीत.
त्यानंतर नामदेवांच्या या पदयात्रेची कल्पना देणारा पुरावा म्हणजे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी शके १८४६ मध्ये प्रसिद्ध केलेली `महिकावतीची ऊर्फ माहिमची बखर' होय. मलिक बहाद्‍अदूर ऊर्फ मलिक गाझी बेग ऊर्फ गिआसुद्दिन तुघलक हा त्यावेळी दौलताबादेचा अधिकारी म्हणजे सुलतान होता. त्याची आणि नामदेवांची भेट इ.स. १३२१ ते १३२६ (शके १२४३ ते १२४८) च्या काळात केव्हातरी झाली असावी. याच काळात भक्त्तिमार्गांच्या कार्यासाठी नामदेवांनी भ्रमण करून प्राणपणाने सर्वत्र चैतन्यदायी टवटवी निर्माण केली आणि अनेकांना भक्त्तिमय जीवनाच्या प्रवाहात आणून सोडले.
या चवथ्या पदयात्रेत नामदेवांनी कीर्तनभजनाच्याद्वारे विठ्ठलनामाचा आणि ईश्वरभक्त्तीचा एवढा प्रचार केला की त्याचा प्रभाव मध्य भारत व उत्तर भारत येथील साहित्यावर झाल्याशिवाय राहिला नाही नदी कोरडी पडली तरी तिच्या पात्रात थोडेसे उकरताच जसा पाण्याचा प्रवाह झुळझुळताना दिसतो त्याप्रमाणे नामदेवांच्या भक्त्तिप्रवाहाचे परिणाम त्यांच्यानंतर होऊन गेलेल्या मध्य भारत व उत्तर भारतातील साहित्यात आढळून येतात. हे नामदेवानंतर पन्नास वर्षांनी होऊन गेलेल्या भक्त्तकवी नरसी मेहतांच्या (शके १३३४ ते १४००) नामदेवासंबंधी काव्यसंग्रहातील गौरवपर उद्‍गारांवरून दिसून येते--
१) जेणें नामानुं छापरूं छाई आल्युं (ज्याने नामदेवांची झोपडी दुरूस्त केली)
२) रामानुं नाम नामदेवे लिधुं (नामदेवांनी रामनाम घेतले).
३) नाम हाथ ते दूध पीला..... नामानुं छापरूं आल्युं छाई (नामदेवाच्या हातचे जो दूध प्याला, ज्याने नामदेवांची जोपडी दुरूस्त केली.)
४) नामदेव गाय सजीवन करें ....ते नामदेवनी जीवाडी गाय (नामदेवांनी मृत गाय जीवंत केली..... ज्या नामदेवांनी).
५) नामानुं छापरुं छाई दिधुं (नामदेवाची झोपडी ज्याने शाकारून दिली).
६) नामानुं छापरुं छाईने आपींयु कबीरानी राखी अविचल वाणी (ज्याने नामदेवाची झोपडी उभारली, कबीराच्या अढळ वाणीचे रक्षण केले).
७) सोई नामदेवनुं देवळ फेरव्युं (ज्याने नामदेवासाठी देऊळही फिरविले).
८) नामा हाथते दुध पीईल देवा... नामाचा छादरा दिला छाई (जो नामदेवांच्या हातचे दूध प्याला, ज्याने नामदेवाची चादर शिवून दिली ).
९) पंढरपूर नगर छे एक, ते मां नामा साई विशेक, नामदेवनुं हरिसी प्रीत (पंढरपूर नामक एका गावात विशेष हरिप्राती असलेले नामदेव रहात).
पुढे नामदेवांनी राजस्थानकडे संचार केला. ठिकठिकाणच्या मुक्कामांत त्यांनी भजनकीर्तनाचा पाऊस पाडला. त्यामुळे राजस्थानच्या जीवनावर अनंत काळ संस्कार करणारे परिणाम झाले.
राजस्थानमधील जयपूर येथील ३ नामदेव मंदिरे, जोधपूर, अलवर येथील मंदिरे, बिकानेरजवळ कोलायतजी येथील नामदेवरायांची विहीर, पुष्कराज येथील २ मंदिरे, बगरू, संगनिर, काळाडेरा इत्यादी ठिकाणी जुन्या नव्या स्वरूपात उभी असलेली १५० चे वर नामदेवांची लहान मोठी सार्वजनिक मंदिरे ही त्यांच्या राजस्थानमधील प्रचारकार्याची आजही साक्ष देतात.
समाजिकदृष्ट्या नामदेवांच्या पदयात्रेचा दुसरा असा एक परिणाम झाला की या भागातील शिंपी तेव्हापासून स्वतःस `नामावंशी छिपा दर्जी ' असे म्हणू लागले या जातीची संख्या राजस्थानात हल्ली मोठया प्रमाणात आहे.
राजस्थानातील प्रसिद्ध कवयित्री मीराबाई ( इ.स. १४९८ ते १५४६) यांनी पूर्ववर्ती कवींचा उल्लेख करताना नामदेवांचाही भावपूर्ण शब्दांत निर्देश केला आहेः--
म्हारे नैंणा आगे रहाजो जी, स्याम गोविंद //टेक//
दास कबीर घर बालद जो लाया, नामदेव की छान छबन्द /
दास घना को खेत निपजायो, गज की टेर सुनन्द /
सब सन्तो का काज सुधारा, मीरा सूं दूर रहन्द //
(हे श्यामवर्ण गोविंद, माझ्या डोळ्यासमोर तुम्ही रहा....आपण कबीराच्या घरी बैल आणला, नामदेवाचे छप्पर शाकारून दिले. घन्नादासाच्या शेतात बी पेरलेत आणि गजेन्द्राचा धावा ऐकून त्याच्या सहाय्यार्थ धावून गेलात. सर्व संतांची कामे केलीत परंतु मीराबाईपासून तुम्ही दूर का रहाता?
राजस्थानानंतर, नामदेव वैष्णवांच्या मांदियाळीसह भक्त्तिमार्गाचा प्रचार करीत प्रयाग वाराणसी, गया इत्यादी स्थळी गेले. त्यावेळी उत्तरेस मुसलमानी सत्तेचे एकछत्र राज्य होते. परिणामी, भारतीय समाज हतबल झाला होता. दुभंगून गेला होता.हिंदी भाषिकांच्या या प्रदेशांत नामदेवांनी कीर्तन संस्थेच्या प्राचीन व्यासपीठावरून एकेश्वरवादाचा, विशुद्ध भक्त्तीचा, जातिवर्णनिरपेक्ष मानवधर्माचा आणि सदाचारपूर्ण जीवनाचा आदेश, त्या कालातील लोकभाषेत म्हणजे हिंदीभाषेत दिला. त्यांनी हिंदु-मुसलमानांच्या भावनात्मक एकतेसाठी आवाहन केले. मानवी समतेचा पुरस्कार केला. नामदेवांची कित्येक पदे निर्गुणवादपरिपूर्ण आहेत. हिंदु-मुसलमानांच्या अंध धर्मश्रद्धेचा त्यात उपहासच आहे. या दोन्ही धर्मांतील रूढींचा व बोजड कर्मकांडाचा त्यांनी निषेधच केला आहे. त्यांच्या पुढील काव्यपंक्त्ती पहा--
आजु नामे बीठुला देखिआ मुरखको समझाऊ रे //१// रहाउ//
पांडे तुमरी गाइत्री लोघे का खेतु खाती थी //
लै करि ठेगा टगरी तोरी लांगत लांगत जाती थी //१//
पांडे तुमरा महादेउ घडले बदल चडिआ आवतु देखिआ था //
मोदी के घरि खाणा पाका बाका लडका मारिआ था //२//
पांडे तुमरा रामचंदु सो भी आवतु देखिआ था //
रावन सेती सरबर होई घरकी जोइ गवाई थी //३//
हिंदु अंधा तुरकू काणा / दुहांते गिआनी सिआणा //
हिंदू पूजै देहुरा मुसलमाणु मसीति //
नामे सोई सेविआ जह देहुरा न मसीति //४//२९//
[मुर्खांनो, मला समजावून सांगावे लागत आहे की, मी आज साक्षात निराकार परमेश्वर पाहिला. पंडितांनो, तुमची गायत्री एक लोध्याचे (खेडवळ शेतकऱ्याचे) शेत खात होती. त्याने हाती दंडा घेऊन तिची एक तंगडी मोडून टाकली, तेव्हा ती लंगडत लंगडत जात होती. (