|
|
नामदेव म्हटले की त्यांच्या जोडीने एका स्त्री संताचे नाव घेतले जाते, ते म्हणजे संत जनाबाई. लहानपणापासूनच जनाबाई नामदेवांच्या घरात वाढली. नामदेवांच्या संगतीत वावरली, धावली, खेळली. बालपणीचे थोडे-बहुत खेळ ती नामदेवांच्या संगतीनेच खेळली. त्यांच्या संगतीतच श्री पांडुरंगाचे दर्शन घेतले. कधी पूजाअर्चा केली. नामदेवांच्या संगतीनेच पांडुरंगाच्या भक्तीत रंगून गेली. मराठवाड्याने दिलेले हे आणखी एक भक्तीच्या कोंदणातले स्त्री रत्न.
मराठवाड्यातल्याच परभणी जिल्ह्यात गंगाखेड गाव आहे. ते आहे गोदावरी नदीच्या काठी, या गावात एक शुद्र दांपत्य रहात होते. नवऱ्याचे नाव होते दमा आणि पत्नीचे नाव होते कारुंड. दमा गावभर काही मिळेल ते काम करायचा आणि पत्नीसह आपला उदरनिर्वाह चालवायचा, पत्नी कारुंड ही घरातील कामकाज पाहयची. दोघांची राहणी अगदी साधी होती. पण या दोघांची मन मात्र विशाल होती. ती सर्वांशी नेहमी सत्यानेच वागायची. त्यांचे वागणे सरळ असल्याने त्यांचा स्वभाव सर्वांनाच आवडायचा.दमा हा भगवतभक्त होता. नित्यनेमाने विठ्ठलाची पूजाअर्चा करायचा. श्री पांडुरंगाचे नामस्मरण करायचा. आषाढी-कार्तिकीची पंढरपूरची वारी नित्यनेमाने करायची. त्यांचा संसार असा सुखात चालला होता. कधी कुणाशी कुरबुर नाही, तक्रार नाही. दिवस कसे आनंदात चालले होते. संसार सुरळीत चालला असला तरी दोघे मनात अस्वस्थ होते. त्यांच्या घरात त्यांच्या अंगाखांद्यावर खेळणारे मूल नव्हते. रोज पांडुरंगासमोर हात जोडून ते आपल्याला एखादे मूल होऊ दे, म्हणून त्याची प्रार्थना करायचे, पण देवाने त्यांची प्रार्थनी ऎकली नव्ह्ती.
एकदा एकादशी दिवशी दमा आणि कारुंड विठ्ठालाच्या दर्शनाला गेले. तेथे दोघांनी करुणा भाकली. " देवा, आम्हाला संततिसुख लाभू दे. आता आणखी काही नको." त्या रात्री दमा झोपला होता. त्याची प्रार्थना विठ्ठालाच्या कानावर गेली. त्या रात्री पांडुरंग दमाच्या स्वप्नात गेले. दमाला म्हणाले," दमा, मी तुमची सेवा पाहिली. तुम्ही सत्यधर्मात व सरळपणाने वागत. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. पण तुझ्या नशिबात मुलगा मात्र नाही तुला मुलगी होईल. तिची पुर्वपुण्याई फ़ार मोठी असेल म्हणुन तिचे नाव जनाबाई ठेव. बाळपणी ती तुमच्या घरातच राहील. पण तिचा संबंध नामदेवाच्या चरित्राशी यॆणार आहे. म्हणून मोठी झाल्यावर तू तिला नामदेवाचे वडील दामाशेटी यांना अर्पन कर. ती तिथे वाढेल. मोठी होईल व नामदेवाबरोबरच तिचाही लौकिक वाढेल."
सकाळ झाली. दमा उठला. उठल्याबरोबर त्याने आपले पत्नी कारुडांला रात्री पाहिलेले स्वप्न सांगितले. दोघांनाही आनंद झाला. त्यांनी हात जोडून पांडुरंगाचे नामस्मरण केले.
पांडुरंगाच्या कृपेने कारुंडाला दिवस गेले. नऊ महिन्यांनी ती प्रसूत झाली. ईश्वरी संकेताप्रमाणे तिला मुलगी झाली. स्वप्नात पांडुरंगाने सांगितल्याप्रमाणे तिचे नाव जनाबाई ठेवले.
दिसा-मासा जनी वाढत होती. खेळत होती. आईवडिलांना आपल्या बाळलीलांनी आनंद देत होती. आईवडिलांकडून भक्तीचे संस्कार तिच्यावरही घडत होते. आईवडील घरात अभंग म्हणायचे; ते जनी ऎकायची. ते अभंग ती गुणगुणायची. ते सर्व अभंग ऎकता ऎकताच तिला पाठ होऊन गेले होते. ते पाठ झालेले अभंग ती आईवडिलांना परत म्हणून दाखवायची. तिचा गोड आवाज ऎकणाऱ्या शेजाऱ्यापाजाऱ्यांनासुध्दा आनंद द्यायचा. आईवडिलांना तिचे कौतुक वाटायचे.
जनी थोडी मोठी झाली. एकदा दमा व कारुंड जनीला घेऊन विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला गेले. एकादशी होती. गावातील गल्लीबोळांतून भजनं चालू होती. टाळ-मृदुंगाचा आवाज ऎकू येत होता. बुक्का व तुळशीच्या मंजिऱ्याचा वास दरवळत होता. श्री विठ्ठलाच्या नावाचा घोष चालू होता. 'पांडुरंग, पांडुरंग - पांडुरंग , पांडुरंग '
कारुडांने - देमाने पांडुरंगाला नमस्कार केला. मग जनाला हात जोडून मनोभावे देवाला नमस्कार करण्यास सांगितले. तिने हात जोडले. मनोभावे नमस्कार केला. ती श्री पांडुरंगाच्या मुखाकडे एकटक पाहू लागली. पहाता पहाता तिची तिथे समाधीच लागली, ती तेथून हलायलाच तयार नव्हती. वडिल सारखे 'चला, जाऊ या, चला जाऊ,' या म्हणत होते. पण तिचे ठरलेले एकच उत्तर 'तुम्ही जा मी येणार नाही.'
'अगं आपण घरी जाऊन येऊ गं!' वडिल म्हणाले पण जनीचे उत्तर एकच, 'मी येणार नाही. तुम्ही जा.' शेवटी कारुंडाला रडूच आले. ती म्हणाली," अगं जना, तुला सोडून आम्ही कसे जाणार? आम्ही गेल्यावर तुझ्याकडे कोण पाहील?" "तो विठ्ठल बघेल की," जना म्हणाली. शेवटी दमा कारुंडाला म्हणाला," आपण जाऊन परत येऊ चला." ते दोघे निघून गेले. रात्रभर जना देवळातच समाधी लावून बसली होती.
सकाळ होऊ लागली होती. जना समाधीतून बाहेर आली आणि तिच्या बाळसुलभ मनाने आईवडिलांचा शोध घेतला. तिला रडूच आले. मंदिराचा सर्व परिसर तिने शोधला. शेवटी परत येऊन मंदिराजवळ रडत थांबली.
नित्याप्रमाणे दामाजीशेटी पांडुरंगाच्या दर्शनाला सकाळी सकाळीच आले होते. दर्शन घेऊन बाहेर पडताना ही रडणारी जना त्यांना दिसली. त्यांनी तिची चौकशी केली. तिला ते आपल्या घरी घेऊन आले.
थोडया वेळाने दमा आणि कारुंड श्री विठ्ठालचे दर्शन घेऊन तेथून जनाला घेऊन जाण्यासाठी मंदिरात आले. मंदिरात जाऊन पहातात, तो जना कोठे दिसेना? दमाच्या मनावर फ़ार मोठा आघात झाला. त्यांनी तिथे शोध घेतला. येणाऱ्या-जाणाऱ्याकडे चौकशी केली. तेव्हा कळले, की दामाशेटी एका रडणाऱ्या मुलीला आपल्या घरी घेऊन गेले आहेत.
दमाने विचारले," दामाशेटी म्हणजे नामदेवाचे वडील का?"
लोकांनी उत्तर दिलं,"हो, तेच ते."
लोकांचे उत्तर ऎकताच दमाला आपल्याला पडलेल्या स्वप्नाची आठवण झाली. पांडुरंगाने स्वप्नात सांगितलेले होते. नामदेवाचे वडील दामाजीशेटी यांच्याकडे जनाला ठेवा. मग दामाशेटीच्या घराचा शोध घेत तो त्यांच्या घरी पोहोचला.
दामाशेटीच्या घरासमोर आला. दार वाजवले. दार उघडले. तेव्हा तो म्हणाला,",मला दामाजी शेटींना भेटायचं आहे." दरवाजा उघडणारे गृहस्थ त्याला म्हणाले, "मीच दामाशेटी." मग त्याने आपला परिचय दिला. गंगाखेडहून आलो असं म्हणाला, मग आपल्याला पडलेल्या स्वप्नातील दृष्टांताविषयी सांगून आमची जना रात्रभर मंदिरात बसली होती व सकाळी आपल्याबरोबर आली, असे लोकांनी सांगितले म्हणून आपणाकडे आलो, असे सांगितले.
दामाजींनी जनाला हाक मारली. ती धावत येताच कारुंडाने तिला अतिशय प्रमाने छातीशी कवटाळले. प्रेमभराने तिचे पापे घेतले. कारुडांच्या भावनेचा भर ऒसरल्यावर दमा म्हणाला-
"खरं म्हणजे जना माझी एकुलती एक लाडाची मुलगी. तशी ती मला जड नाही. पण मघाशी मी आपणास सांगितल्याप्रमाणे पांडुरंगाचा मला आदेशच होता, की ती मी आपल्याला अर्पण करावी. त्याप्रमाणे माझी जना मी आपल्या चरणी अर्पण करतो आहे. तिला आपल्या ऒटीत घ्या."
दामाशेटीने मनात विचार केला. ज्या अर्थी एक पिता आपल्याला मोठया नवसाने झालेली एकुलती एक मुलगी अर्पण करतो आहे, त्या अर्थी ही नक्कीच परमेश्वराची इच्छा असली पाहिजे. त्या परमेश्वराचे संकेत कोण जाणू शकणार आहे? मग ते दमाला म्हणाले, " हे पहा, मीसुध्दा एक विठ्ठालाचा भक्त आहे. ईश्वरी संकेतावर माझा विश्वास आहे. आता ही जना माझी झाली आहे. तुम्ही आता तिची अजिबात काळजी करु नका. " या उत्तराने दमाला समाधान वाटले. त्याने दमाजीशेटीला नमस्कार केला व कारुंडासह जड अंत:करणाने गंगाखेडला परत गेला.
नामदेवांचे कुटुंब चौदा जणांचे होते. त्यात दमाजींनी ही पंधरावी मुलगी स्विकारली, हे पाहून गोणाईच्या कपाळावर आठयांचे जाळे पसरले. छोटया जनाच्या हे नजरेतून सुटले नाही. लगेच गोणाईला बिलगून ती म्हणाली, "आई, तुम्ही बिलकूल काळजी करु नका. मी काही तुम्हाला जड होणार नाही. आपल्या घरचं सगळं काम, धुणं-भांडी, झाडण-लोटण, दळण-कांडण मी करीत जाईन."
दामाजी पुढं झाले. त्यांनी जनाला तिच्या हाती दिले. म्हणाले, " ही देवाची ठेव आहे. तिला नीट सांभाळ."
एवढ्याश्या जनाची भक्ती गोणाईला कळली होती. तिची धिटाई व समजूतदारपणा आताच अनुभवला होता. गोणाईने तिला जवळ घेतली. कुरवाळले. दामाशेटीच्या घरात आता दोन मुले आनंदात खेळत होती, बागडत होती. जनीला आता नामदेवाची सोबत मिळाली होती.
जनीचे वडील दमा अधूनमधून पंढरपूरला येत होते. जनील भेटत होते. तिला पाहत होते. तिच्याशी बोलत होते. ती आनंदात आहे, हे पाहून समाधान मानत होते.
पुढे जनाने आपल्या अभंगात नामदेवांच्या परिवाराचे वर्णन केले, ते असे -
गोणाई राजाई सासु- सुना / दामा - नामा जाण बाप - लेक /
नारा, विठा, गोंदा, महादा चौघे पुत्र / जन्मले पवित्र त्यांचे वंशी //
लाडाई, गोदाई, यॆसाई, साखराई / चौघी सुना पहा नामयाच्या //
लिंबाई ती लेकी आऊबाई बहिणी // वेडे पिशी जनी नामयाची //
नामदेवाचे घरी // चौदाजण स्मरती नारायणा //
आणिक मायबाप पाही / नामदेव राजाबाई /
निंबाबाई लेकी / आऊबाई बहिणी / पंधरावी ती दासी जनी //
|
|